Tue, Aug 04, 2020 11:42होमपेज › Konkan › गणेशोत्सवासाठी येणार्‍या चाकरमान्यांची व्यवस्था होणार

गणेशोत्सवासाठी येणार्‍या चाकरमान्यांची व्यवस्था होणार

Last Updated: Jul 11 2020 1:24AM
ओरोस : पुढारी वृत्तसेवा 

मुंबईतून गणेशोत्सवासाठी येणार्‍या चाकरमान्यांची व्यवस्था कशी करावी, याबाबत शुक्रवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत विस्तृत चर्चा केली आणि अनेक निर्णय घेऊन तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे ठरले. याबाबतची माहिती बैठकीनंतर खा. विनायक राऊत यांनी तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रकारांना दिली. 

सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिषद कक्षात सिंधुदुर्ग जिल्हा शांतता समितीची बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली खा. विनायक राऊत, जिल्हाधिकारी  के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, आ. वैभव नाईक,  भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, राष्ट्रवूदीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, जिल्हा पत्रकार  संघाचे अध्यक्ष  गणेश जेठे,  निवासी जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिपे व जिल्ह्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधी  उपस्थित होते. यामध्ये पालकमंत्र्यांनी व्हिडीओकॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला होता. 

बैठकीत गणेशोत्सव कालावधीत येणार्‍या चाकरमान्यांना सात दिवस आधी क्‍वारंटाईन कालावधी ठेवून त्यानंतरचा तीन दिवसाचा कालावधी घरामध्ये असा एकूण दहा दिवसाचा कालावधी निश्‍चित करण्यात अशी मागणी शासनाकडे करण्याचे ठरले आहे. तसेच  अठ्ठेचाळीस तास अगोदर कोवडि टेस्ट करून  घेणार्‍यांसाठी शासनाने 2500 ऐवजी मोफत किंवा 1000 ना मात्र किंमत ठरवावी. जिल्ह्यात येणार्‍या चाकरमान्यांसाठी सुलभ पद्धतीने पास उपलब्ध करून देण्यात यावेत,  खाजगी वाहन तसेच एसटी व अन्य सुविधा उपलब्ध करून देताना टोलची मोफत सवलत देण्यात यावी अशी मागणी करण्याचे ठरल्याची माहिती खा.राऊत यांनी दिली.

गणेशोत्सव कालावधीत आरती, भजन आणि गणेशमूर्तींचे विसर्जन मिरवणुका यासाठी लोकांची मर्यादा किती असावी यावर झालेल्या चर्चेत लग्न समारंभाप्रमाणे गणेशमूर्ती विसर्जनाच्यासाठी दहा किंवा वीस लोकांचा समावेश असावा, अशा पद्धतीची व्यवस्था ग्राम नियंत्रण समिती यांच्या माध्यमातून करण्याची परवानगी मिळावी. घरगुती आणि सामुदायिक गणपती कुटुंबातून साजरा करण्याची परंपरा आहे,या परंपरेला बाधा येणार नाही याचाही विचार शासनाने करावा असे प्रस्तावित करण्याचे ठरले असेही खा.राऊत म्हणाले.  राजन तेली यांनी पडवे येथील राणे यांच्या हॉस्पिटलमध्ये चार दिवसात कोविड लॅब सुरू होईल अशी माहिती दिली.आ. वैभव नाईक यांनी  ई पासची  सुविधा सोपी असावी अशा सूचना बैठकीत मांडल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी गणेशोत्सव कालावधीत गणेश भक्तांना त्रास होऊ नये या दृष्टीने वाडी ऐवजी घरापुरताच कंटेन्मेंट  झोन असावा, अशी सूचना मांडली. तर  येणार्‍या गणेश भक्‍तांसाठी प्रशासनाने आणि शासनाने योग्य आणि सुस्पष्ट असे नियोजन करावे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी सुचविले, असेही बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.