Tue, Aug 04, 2020 10:24होमपेज › Konkan › रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा 29 वा बळी

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा 29 वा बळी

Last Updated: Jul 11 2020 1:24AM

संग्रहित छायाचित्ररत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा रुग्णालयात गेले आठवडाभर कोरोना विभागात उपचार घेणार्‍या 48 वर्षीय प्रौढाचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 29 वर गेली आहे. गुरुवारी रात्री उशिरा आलेले 95 अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेलाही हायसे वाटले आहे.

कोरोनासोबत श्‍वसन प्रक्रिया बंद होऊन मृत पावलेला हा रुग्ण कुर्धे, पावस येथील होता. हा रुग्ण 26 जून 2020 रोजी मुंबईहून आला होता. त्याला 4 जुलै 2020 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळेपासून तो व्हेंटिलेटरवर होता. उपचारादरम्यान त्याचा शुक्रवारी मृत्यू झाला.

जिल्ह्यात सध्या 75 अ‍ॅक्टिव्ह कंटेन्मेंट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात 22 गावांमध्ये, दापोलीमध्ये 8 गावांमध्ये, खेडमध्ये 14 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 20 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 1 आणि राजापूर तालुक्यात 5 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

मुंबईसह एम. एम. आर. क्षेत्र तसेच इतर जिल्ह्यातून  आलेल्या 14 हजार 596 व्यक्‍तींना होमक्‍वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 11 हजार 816  नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 11 हजार 622 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 839 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 10 हजार 748 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 194 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.  194 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.

परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि.  9 जुलै 2020 अखेर एकूण 1 लाख 73 हजार 091 व्यक्ती दाखल झाल्या आहेत तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्ह्यात गेलेल्यांची संख्या 92 हजार 212 आहे.