Mon, Jan 18, 2021 19:03
श्रीदुर्गा केमिकल्स आगीत भस्मसात; कोट्यवधीची हानी

Last Updated: Jan 15 2021 2:25AM
चिपळूण/खेड : पुढारी वृत्तसेवा

लोटे औद्योगिक वसाहतीमधील श्रीदुर्गा फाईन केमिकल्स कंपनीमध्ये बुधवारी (दि.13) दुपारी शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. दरम्यान, कंपनीतील पाच  कर्मचार्‍यांनी शॉर्टसर्किट होताच पळ काढल्याने सुदैवाने या आगीत मनुष्य हानी झाली नसली तरी कंपनीचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे .

ही घटना बुधवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी कंपनीत पाच कर्मचारी काम करत होते. दुपारच्या सुमारास कंपनीमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे लक्षात येताच तेथील कर्मचार्‍यांनी पळ काढला. कंपनीमध्ये टोलू इन हे ज्वालाग्राही रसायन मोठ्या प्रमाणात असल्याने आग भडकणार, हे लक्षात येताच कर्मचार्‍यांनी पळ काढला. यानंतर आगीचा भडका उडाला. धुराचे लोळ आकाशात पसरले. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ धुराचे काळे  लोळ पसरले होते. 

दुर्गा केमिकल कंपनीला आग लागल्याचे लक्षात येताच एका ग्रामस्थाने लोटे एमआयडीसीतील अग्निशामक यंत्रणेला ही घटना कळवली. त्या नंतर लोटे फायर फायटरचे दोन बंब, चिपळूण नगर परिषद, खेड नगर परिषदेचे बंब घटनास्थळी धावले व तब्बल तीन तास आग विझवण्याचा प्रयत्न केला. यावेळी लोटीतील राजा पटवर्धन, राजू आंब्रे यांनी टँकरच्या साहाय्याने अग्नीशमन बंबाला पाणी पुरविले. आगीवर नियंत्रण आल्यानंतर पाच वाजल्यापासून पुन्हा पाण्याचा मारा करण्यात आला.

दरम्यान, कंपनीचे मालक बाहेरगावी असल्याने अद्याप नुकसानाची आकडेवारी समजू शकली नसली तरी या आगीमध्ये कंपनी जळून खाक झाली आहे. त्यामुळे कंपनीत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या आगीमुळे लोटे औद्योगिक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले