जयसिंगपूर : संतोष बामणे
जगभरात भाजीपाल्याची राणी म्हणून ओळखल्या जाणार्या भेंडीला मोठी मागणी असते. मात्र आता रक्तदाबावर गुणकारी अशी जीवनावश्यक आरोग्यदायी लालभेंडी आपल्याला खायला मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोंडीग्रे (ता. शिरोळ) येथे कुसूम संजय बोरगावे या शेतकरी महिलेने राज्यात आदर्श निर्माण करीत लाल भेंडीचा पहिला प्रयोग यशस्वी केला आहे. शिवाय कोल्हापूरच्या भेंडीचा प्रयोग आता देशभरात अवलंबला जाणार आहे.
शिरोळ तालुका हा भाजीपाला उत्पादन करण्यात देशात अग्रेसर आहे. येथून फ्लॉवर, कोबी यासह विविध भाजीपाला देशातील मोठ्या शहराच्या बाजारपेठेत जातो. त्यामुळे शेतकरी सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करताना आपण पाहतो आहे. तर आगळे-वेगळेपण जोपासत कोंडीग्रेच्या कुसूम बोरगावे या शेतकरी महिलेने श्रीवर्धन बायोटेकमधील २० वर्षाच्या अनुभवाच्या जोरावर युपीएम गोल्डन फिल्ड यांच्यामार्फत देशात पहिल्यांदाच कुमकुम जातीच्या भेंडीचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. प्रथम ५ गुंठे क्षेत्रात हा प्रयोग केला. यात ही भेंडी जीवनावश्यक आरोग्यदायी असल्याचे तपासणीतून पुढे आले आहे.
वाचा - कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे १,३४६ सभासद अपात्रच
त्यानंतर आता २० गुंठे क्षेत्रात ही लाल भेंडी फुलवली आहे. बोरगावे यांनी माळभागावरील शेतात दोन बेडमध्ये साडे चार फूट अंतर ठेवून सव्वा फूट अंतरावर भेंडी रोपांची लागण केली आहे. २० गुंठे क्षेत्रात आठ हजार रोपे लागण केली असून ड्रीपने दररोज २० मिनिटे पाणी दिले जाते. त्याचबरोबर पिक वाढ व किटकनाशकासाठी खते व फवारणीचा गरजेनुसार वापर केला जात आहे. तर ४५ दिवसांत पहिल्या भेंडीची तोड करण्यात आली आहे. ही भेंडी कोल्हापूर, गोवा, दादर, सांगली यासह विविध बाजारपेठेत पाठविण्यात आली असून त्याला प्रथम दर्शनी तब्बल ८० ते १०० रूपयांचा दर मिळाला आहे. बोरगावे यांनी केलेला प्रयोग हा यशस्वी झाल्याने राज्यात कोल्हापूर जिल्ह्याने नवा ठसा उमटविला आहे.
आरोग्यदायी फायदे
*हिमोग्लोबिन वाढीसाठी भेंडीत आयर्न ०.५७ मिली
*शरीरात नको असलेले घटक कमी करण्यासाठी पॉली अनसॅक्युलेटेड ०.३१
*रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी सोडियम ७.९५ मिली
*प्रोटीन २.३६
*डायरेट्री फायबर ४.७२ (प्रति १०० ग्रॅममध्ये असलेले घटक)
उच्च प्रयोगशाळेत तपासणी
भेंडीची पिक जगातील प्रत्येक देशात घेतले जाते. आजपर्यंत अनेक कंपन्यांनी हिरव्या भेंडीतच बदल केले. मात्र गेल्या अनेक वर्षापासून भेंडीत नाविन्यपूर्ण बदल करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान युपीएम गोल्डन फिल्ड कंपनीच्या संशोधनानंतर या भेंडीचे बी तयार करण्यात आले. याचा प्रयोग कुसूम बोरगावे यांच्या पाच गुंठे क्षेत्रात केला होता. त्याची उच्च पातळीवरील प्रयोग शाळेत तपासणी केल्यानंतर त्याच आरोग्यदायी घटक आढळून आले आहेत. त्यामुळे आता २० गुंठ्यातील प्रयोग यशस्वी होवून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशभरात होणार आहे.