Wed, May 19, 2021 05:35




कोल्हापूर : तमनाकवाडा, कापशी, बाळेघोल परिसरात हत्तीचा धुमाकूळ, फोटो, व्हिडिओसाठी बघ्यांचा पाठलाग (video)

Last Updated: Feb 25 2021 12:25PM





माद्याळ (जि. कोल्हापूर) : रमेश कांबळे

चिकोत्रा खोऱ्यातील तमनाकवाडा, बाळेघोल (ता. कागल) परिसरात आज सकाळी साडेसहाच्या दरम्यान टस्कराचे आगमन झाले. बाळेघोल गावच्या पुर्वेकडून हणबरवाडी, बेरडवाडी जंगलातून अन्न व पाण्याच्या शोधात हा टस्कर आला. 

सकाळी कापशी, बाळेघोल मार्गावरील मारुती माळ येथे फिरायला जाणाऱ्या लोकांना तो प्रथम  दिसला. त्याने तमनाकवाडा आंबेओहळ पुलाजवळून तमनाकवाडा हद्दीत प्रवेश केला. ही बातमी नजिकच्या नागरिकांना समजल्यानंतर बघ्याची प्रचंड गर्दी झाली. यामुळे हत्ती  बिथरला. वाट दिसेल तिकडे सैरावैरा धावत सुटला. अक्षरशः फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी लोक त्याच्या मागे लागले. बिथरलेला टस्कर काही काळ उसातच थांबला. तो रस्ता पार करून पुन्हा बाळेघोल हणबरवाडी गावाला लागून असलेल्या डोंगराकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र रस्त्यावर झालेल्या गर्दीमुळे तो बिथरत होता. धोका असूनही अनेक तरुण आणि युवक त्याच्या मागे लागले होते. वन विभागाचा एक कर्मचारी येथे उपस्थित होता. मात्र तो काही करू शकत नव्हता. रस्त्यावर गर्दी वाढल्यामुळे नऊच्या सुमारास रस्ता पार करून टस्कर पुन्हा बाळेघोल, हणबरवाडीच्या दिशेने उसाच्या व ज्वारीच्या पिकातून पुढे गेला. या वेळीही युवक त्याच्या मागे लागलेले होते.

दरम्यान, वन विभागाचे कर्मचारी हत्तीला हुसकावून लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ही घटना समजताच कापशी वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. कळपातून वाट चुकून टस्कर आल्याचे त्यांनी सांगितले.  

वाचा : शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी समरजितसिंह यांचे उपोषण

वाचा : गोकुळ शिरगाव येथून शाळकरी मुलीचे अपहरण