Mon, Apr 12, 2021 03:32
...अन् सहकार विभाग होणार अधिकार्‍यांविना पोरका

Last Updated: Apr 08 2021 2:04AM

कोल्हापूर : डी. बी. चव्हाण 

राज्यात सहायक निबंधकांची 275 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 108 पदे गेली पाच ते सात वर्षे रिक्त आहेत, तर बदलीतून 86 पदे रिक्त होणारच आहेत. अशी एकूण 194 पदे रिक्त होणार आहेत. याशिवाय मे महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्ती व अन्य कारणांमुळे 100 पदे रिक्त होणार आहेत. यामुळे सहकार विभागच पुरता खाली होणार असून अधिकार्‍यांविना पोरका होणार आहे. याचे थेट परिणाम सहकारी संस्थांच्या वाढीवर आणि गुणवत्तेवर होणार आहे. यामुळे शासनाने ही पदे भरण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

राज्यातील सहकारी संस्थांचे कामकाज ज्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा उपनिबंधकांच्या मार्गदर्शनाखाली चालत असते; पण प्रत्यक्षात सहकारी संस्था आणि सहकार विभागातील दुवा म्हणून तालुक्याचे सहायक निबंधकच काम करत असतात. त्यासाठी प्रत्येक तालुक्याला सहायक निबंधक हे पद मंजूर करण्यात आले आहे; पण गेले दहा वर्षे कोणत्या प्रकारे ही पदे भरलेली नाहीत. त्याशिवाय सहकार अधिकारी श्रेणी 1 या पदावरील अधिकार्‍यांनाही पदोन्नती देण्यात आलेली नाही. 

सहकार चळवळ बळकट करणे सहकारी संस्थांना येणार्‍या समस्या सोडवणे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, सभासद, ग्राहकांच्या असलेल्या तक्रारींचा निपटारा करण्याचे काम सहायक निबंधकांकडे सोपविण्यात आले आहे; पण ही पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्याचा परिणाम संस्थांच्या कामकाजावर व सभासदांना सेवा देण्यावर होत आहे. 

राज्याच्या विकासाला मोठी चालना देण्याचे काम सहकार विभागाकडून केले जाते. त्यामुळे हा विभाग सर्वच बाबींनी सक्षम असणे आवश्यक आहे; पण वर्षानुवर्षे सरकार दरबारी सहकार विभागाला दाबले जाते. त्यामुळे हा विभाग नेहमीच उपेक्षित राहिला आहे. शासनाकडून या विभागातील अधिकार्‍यांची पदोन्नती, निवृत्ती किंवा अन्य कारणांमुळे रिक्त होणारी सहायक निबंधकांची पदे भरलेली नाहीत. त्याचे गंभीर परिणाम सहकार विभागावर होत आहेत.

सहकार चळवळ भक्कम करण्यासाठी शासनाने विचार गट स्थापन करून त्यात विचार मंथन केले जात आहे.  सहकारवाढीसाठी ही बाब खूप चांगली आहे; पण रिक्त पदांवरील निर्णयही तातडीने घेणे तितकेच गरजेचे आहे.   

श्रेणी 1 अधिकार्‍यांना ए.आर.चे वेतन; पण पदोन्नती नाही

राज्यात सहकार अधिकारी श्रेणी 1 ची 113 पदे आहेत. ही पदे सहायक निबंधक पदास समकक्ष आहेत. सध्या या पदावर काम करणार्‍या अधिकार्‍यांना ए. आर. दर्जाच्या अधिकार्‍याचे वेतन शासन देते. त्यामुळे सहकार आयुक्तांनी सहकार अधिकारी श्रेणी 1 च्या राज्यातील 113 अधिकार्‍यांना पदोन्नती देऊन सहायक निबंधक म्हणून नियुक्त करावी, असा प्रस्ताव सहकार आयुक्तांनी राज्य शासनाकडे पाठवला आहे. गेले सहा महिने हा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. याबाबत शासन विचार करणार की नाही, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

रिक्त पदांचे परिणाम 

 शासन आणि जनतेचा दुवा म्हणून काम
 संस्थांना येणार्‍या समस्या सोडवणे
 संस्थांच्या कामावर नियंत्रण ठेवणे 
 सभासदांच्या थेट तक्रारी समजावून घेणे व त्याचे निरसन करणे
  ग्राहकांच्या असलेल्या तक्रारींचा निपटारा
सहायक निबंधकांची पदे रिक्त असल्यामुळे वरील कामांची पूर्तता होत नाही, त्याचा थेट परिणाम सहकारी संस्थेच्या बळकटीकरणावर होत आहे.