Thu, Oct 01, 2020 04:03होमपेज › Kolhapur › चाचण्यांची क्षमता वाढली

चाचण्यांची क्षमता वाढली

Last Updated: May 23 2020 1:41AM
कोल्हापूर : अनिल देशमुख
 स्वॅब तपासणीसाठी करण्यात येणार्‍या चाचण्यांची जिल्ह्यातील क्षमता वाढली आहे. दररोज दोन हजार स्वॅबची तपासणी केली जात आहे. राज्यात कोल्हापुरात सर्वाधिक तपासणी होत असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. चाचण्यांची क्षमता वाढल्याने अधिकाधिक चाचण्या होत आहेत, परिणामी बाधित रुग्ण वेळेत आढळून येत असल्याने जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात चाचणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यानुसार राजर्षी छत्रपती शाहूृ महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 23 एप्रिलला सीबीनॅट उपकरणाद्वारे चाचणी करणारी पहिली आणि आरटीपीसीआर उपकरणाद्वारे चाचणी केली जाणारी 30 एप्रिलला दुसरी लॅब सुरू झाली. 

सीबीनॅट उपकरणाद्वारे प्रारंभी 45 तर आरटीपीसीआर उपकरणाद्वारे 150 चाचण्या केल्या जात होत्या. आता त्याची क्षमता वाढविण्यात आली आहे. सीबीनॅट उपकरणाद्वारे केवळ तातडीच्या चाचण्या केल्या जात असून सर्व चाचण्या आरटीपीसीआर उपकरणाद्वारे केल्या जात आहेत. त्याची क्षमता प्रतिदिन 150 वरून आता प्रतिदिन 2 हजार चाचण्या करण्यापर्यंत वाढविण्यात आली आहे.

जिल्ह्यात पुणे-मुंबईहून तसेच अन्य रेड झोनमधून येणार्‍या प्रत्येकाचे स्वॅब घेतले जात आहेत. यामुळे स्वॅबची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 7 हजार 326 चाचण्या प्रलंबित आहेत. तपासणीची क्षमता वाढल्याने येत्या काही दिवसांत प्रलंबितचे प्रमाण कमी होणार आहे. वेळेत चाचण्या होऊन त्याचे अहवाल प्राप्त होत असल्याने मोठ्या संख्येने रुग्ण आढळूनही जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात सध्या तरी यश येत आहे.

 "