Sat, Aug 15, 2020 13:11होमपेज › Kolhapur › सैन्य भरतीसाठी काहींनी बनावट कागदपत्रे दिल्याचे उघडकीस

सैन्य भरतीसाठी काहींनी बनावट कागदपत्रे दिल्याचे उघडकीस

Published On: Apr 28 2018 1:42AM | Last Updated: Apr 27 2018 10:50PMकोल्हापूर : किशोर कटके

येथील शाखा भरती कार्यालयाच्या वतीने सातारा येथे डिसेंबर 2017 मध्ये गोवा राज्यासाठी झालेल्या भरतीमध्ये अनेक युवकांनी महाराष्ट्रात शिक्षण होऊनही गोवा राज्याचा रहिवाशी असल्याची बनावट ‘डोमिसाईल’ सादर केल्याचे उघडकीस आले. 

सातारा येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल आणि पोलिस परेड ग्राऊंडवर 8 ते 18 डिसेंबर 2017 या कालावधीत कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसह गोवा राज्यासाठी झालेली भरती येथील शाखा भरती कार्यालयाच्या वतीने सोल्जर जीडी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर ट्रेड्समन आणि सोल्जर क्‍लर्क या पदांसाठी झाली होती. 

युवकांकडून सादर करण्यात आलेली शैक्षणिक प्रमाणपत्रे ही पश्‍चिम महाराष्ट्रातील आहेत. मात्र, त्यांचे ‘डोमिसाईल’ (रहिवासी दाखला) गोवा राज्यातील आहे. ‘डोमिसाईल’ मिळण्यासाठी संबंधित व्यक्‍ती त्या राज्याची कमीतकमी पंधरा वर्षांची निवासी असावी लागते. वरिष्ठ सैन्य अधिकार्‍यांनी या युवकांकडे खोलवर चौकशी केली असता आमचे शिक्षण जरी पश्‍चिम महाराष्ट्रात झाले असले तरी आमचे वास्तव्य गोव्यातील नातेवाईकांकडे आहे, असे जास्तीतजास्त युवकांनी स्पष्टीकरण दिले. 

सैन्य भरती कार्यालयाने गोवा प्रशासनाकडे ‘ती’ डोमिसाईल पाठवून दिली. त्यांनी तातडीची दखल घेऊन संबंधित यंत्रणेला आदेश दिले असता सर्वच्या सर्व ‘डोमिसाईल’ बनावट असल्याचे आढळून आले. तरीही संबंधित युवकांच्या गोव्याच्या पत्यावर पत्रव्यवहार केला असता सर्व पत्रे सैन्य भरती कार्यालयाकडे परत आली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

सैन्य भरती नेहमीच पारदर्शक, संगणकीकृत 

सैन्य भरती कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणारी भरती ही नेहमीच पारदर्शक आणि संगणकीकृत असते. एवढेच नव्हे तर सैन्य दलाने भरतीसाठी कोणीही एजंट वा दलाल नियुक्‍त केलेले नाहीत. आम्ही प्रत्येकवेळी भरतीसाठी वृत्तपत्रांतून आवाहन करतो त्यावेळी त्यामध्ये  सैन्यात भरती करुन देतो, असे आमिष दाखवून जर कोणी व्यक्‍ती वा दलाल फसवणूक करत असेल तर ते आमच्या ताबडतोब निदर्शनास आणावे, असे आवाहन करत असतो.  - कर्नल संजीवकुमार, निदेशक, शाखा सैन्य भरती कार्यालय, कोल्हापूर