Wed, Aug 05, 2020 19:42होमपेज › Kolhapur › वडेट्टीवार यांचा राजीनामा घ्या

वडेट्टीवार यांचा राजीनामा घ्या

Last Updated: Jul 07 2020 7:14AM
कोल्हापूर : ‘सारथी’ या संस्थेच्या स्वायत्ततेवरून चांगलाच वाद पेटला असून, मराठा समाजातील काही नेत्यांनी सामाजिक न्यायमंत्री विजय वडेट्टीवार यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांच्याकडून ‘सारथी’ हा विभाग काढून घ्यावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, खासदार संभाजीराजे यांनी या सर्व वादाची दखल घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मराठा समाजाची संयुक्त बैठक बोलवावी व यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. ‘सारथी’च्या स्वायत्ततेवरून सुरू झालेल्या वादाने आता टोकाचे वळण घेतले आहे. विजय वडेट्टीवार यांनी आपण ओबीसी असल्यामुळेच आपल्यावर आरोप होत असल्याचे सांगितले. त्यातून नवा वाद सुरू झाला आहे.

स्वायत्तता कमी करण्याचे काम वडेट्टीवारांचेच : राजेंद्र कोंढरे

मराठा समाजाचे नेते राजेंद्र कोंढरे यांनी वडेट्टीवार यांच्यावर आरोेप केले आहेत. वडेट्टीवार ओबीसी म्हणून आरोप केले नाहीत, तर ‘सारथी’ या संस्थेचे कामकाज सुव्यवस्थित चालावे, अशी समाजाची मागणी असल्याचे राजेंद्र कोंढरे यांचे म्हणणे आहे. मुळात ही संस्था बंद पाडण्याचे कारस्थानही सुरू आहे. ‘सारथी’कडे 83 कर्मचारी व अधिकारी होते. त्यापैकी 72 लोकांना कमी करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. या संस्थेची स्वायत्तता रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचा दावा विजय वडेट्टीवार करतात; पण तसा कोणताही विषय त्यांनी मंत्रिमंडळापुढे न नेता स्वतःच्या अधिकारातच काही निर्णय घेतले. त्याचा या संस्थेच्या स्वायत्ततेवर परिणाम झाला. सचिव जे. पी. गुप्ता यांच्यावर आक्षेप घेण्यात आले. काही प्रकरणांत चौकशाही झाल्या. मात्र, त्याचे अहवाल देण्यात आले नाहीत. मराठा समाजाचे शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण दूर व्हावे, यासाठी 325 तारादूतांची नेमणूक करण्यात आली. मात्र, या सर्वांना घरी पाठविण्यात आले. आज पीएच.डी.साठी 560 लोक पात्र आहेत. मात्र, त्याला वडेट्टीवारांचा विरोध आहे. मराठा समाजाला जसे अधिकारी हवे आहेत तसेच डॉक्टरही हवे आहेत. त्यामुळे या सर्व वादात आता त्यांचा राजीनामा तरी घ्यावा किंवा त्यांना ‘सारथी’पासून दूर करावे, असेही कोंढरे म्हणाले.

मराठा-ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये : संभाजीराजे

दरम्यान, त्यांच्या या भूमिकेवर मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत. खासदार संभाजीराजे यांनी मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये. राजर्षी शाहू छत्रपतींनी बहुजन समाजाला न्याय देत एकत्र आणले. त्यांच्या नावाने अस्तित्वात आलेल्या ‘सारथी’ या संस्थेला आणि त्याआडून मराठा समाजाला अशा पद्धतीने बदनाम करणे योग्य होणार नाही. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जबाबदार नेत्यांना हे वर्तन शोभणारे नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. राजर्षी शाहू छत्रपतींच्या नावाने ‘सारथी’ ही संस्था उभी राहिली. ती बंद पाडण्यासाठीचे प्रयत्न आपण करू दिले नाहीत. मराठा समाजातील गरीब यातून उभे राहणार आहेत. फेलोशिप आणि स्कॉलरशिपच्या माध्यमातून अनेकांना त्याचा फायदा होत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. अनेक ठिकाणी मराठा समाजातील लोकांची परिस्थिती वाईट आहे, असेही खा. संभाजीराजे यांनी म्हटले असून, या वादात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालावे व मराठा समाजाबरोबर संयुक्त बैठक घेऊन यातून मार्ग काढावा, अशी मागणी केली आहे.

माझ्याबद्दल शंका असल्यास ‘सारथी’चा कार्यभार सोडणार : विजय वडेट्टीवार 

मुंबई : ‘सारथी’ संस्था स्वायत्त आहे. तिच्या स्वायत्ततेवर गदा आणण्याचा कोणताही प्रयत्न आपण केलेला नाही. परंतु, मराठा समाजाला आपल्याबद्दल काही शंका असेल, तर मी ‘सारथी’चा कार्यभार सोडायला तयार आहे.  त्याबाबत मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देणार आहे, अशी माहिती ओबीसी विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी दिली. 

विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी मंत्रालयाचा कार्यभार घेतल्यापासून ‘सारथी’च्या स्वायत्ततेवर नियंत्रण आणण्यात आल्याचा आरोप मराठा संघटनांकडून होत आहे. याबाबत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा समाजातून याबाबत थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि श्रेष्ठींकडे तक्रारी केल्या आहेत. त्यावरून नाराज झालेल्या वडेट्टीवार यांनी ‘सारथी’चा कार्यभार सोडून देण्याची भूमिका घेतली आहे. ‘सारथी’ संस्था ही मागील भाजप सरकारच्या अखेरच्या काही महिन्यांमध्ये स्थापन झाली. या संस्थेबाबत काही तक्रारी होत्या. या तक्रारींची चौकशी सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्यामार्फत करण्यात आली. या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक परिहार यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर संस्थेचे संचालक मंडळ नव्याने नेमण्यात आले आहे. संस्थेच्या सर्व योजना सुरू ठेवण्यात आल्या आहेत. केवळ 500 विद्यार्थ्यांचे विद्यावेतन डिसेंबरपासून थकलेले आहे. हे विद्यावेतन देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आपल्यावर राजकीय हेतूने आरोप होत आहेत, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.