Wed, May 19, 2021 03:55
सतेज-मुश्रीफ यांची रणनीती ठरली गेमचेंजर

Last Updated: May 05 2021 2:21AM

कोल्हापूर : संतोष पाटील

पालकमंत्री सतेज पाटील यांनी गेल्या पाच वर्षांपासून गोकुळमध्ये सत्तांतर करायचेच, या निर्धाराने आखलेली व्यूहरचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या साथीने तडीस नेली. साडेतीन हजार दूध संस्थांच्या संपर्कासाठी 180 कार्यकर्त्यांना नेमून सुपरवायझरच्या तोडीस तोड यंत्रणा उभी केली.  राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह बंडखोर संचालक विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांची साथ लाभल्याने सतेज-मुश्रीफ यांची रणनीती गोकुळच्या रणांगणात ‘गेमचेंजर’ ठरली. 

2014 मध्ये पराभूत झाल्यानंतर सतेज पाटील यांनी आपल्यापुढे राजकीय अंधार असतानाही विनय कोरे आणि संजय मंडलिक यांच्या साथीने गोकुळच्या 2015च्या निवडणुकीत झुंज दिली. यामध्ये त्यांचे दोन संचालक निवडून आले. या निवडणुकीत पैरा फेडण्याच्या निमित्ताने सत्ताधारी आघाडीला हसन मुश्रीफ यांची साथ लाभल्यानेच सतेज पाटील गटाचे उमेदवार 16 ते 80 मतांनी पराभूत झाले. नंतरच्या काळात दूध संघ मल्टिस्टेट करण्याच्या मुद्द्यावरून मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना गोकुळ रणांगणात साथ दिली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर गोकुळ आणि जिल्हा बँक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकाला पूरक साथ देणारी सतेज आणि मुश्रीफ  यांची विजयी जोडी गोकुळमध्ये कायम राहणार काय, याबाबत उत्सुकता होती. मात्र, मुश्रीफ यांनी विरोधी आघाडीला बळ देण्याचा नुसता निर्णयच घेतला नाही तर पॅलेनमधून पुत्र नाविद मुश्रीफ यांना रिंगणात उतरवले.

बंडखोर संचालक विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांच्या करवीर, राधानगरी आणि शिरोळ तालुक्यातील ठरावधारकांची मते शेवटपर्यंत आघाडीत राहतील, अशी जोडणी मंत्री सतेज पाटील आणि मुश्रीफ यांनी घातली. आमदार पी. एन. पाटील यांचा मोठा प्रभाव असूनही करवीर आणि राधानगरीतील ठरावधारकांना आपल्या बाजूला वळविण्यात दोन्ही मंत्र्यांसह डोंगळे आणि विश्वास पाटील यांना यश आल्याने विजयाचा मार्ग सोपा झाला. मतमोजणीवेळी विश्वास पाटील यांच्या साथीने करवीर तालुक्यातील 425 हून अधिक ठरावधारकांच्या शक्तिप्रदर्शनाने मतदान करून सतेज पाटील यांनी हबकी डाव टाकला. 

आ. विनय कोरे यांनी पाठिंबा दिल्याने नाराज झालेल्या माजी आमदार सत्यजित पाटील यांनी विरोधकांना रामराम करत सत्तारूढ आघाडीशी पुन्हा जुळवून घेतले. शाहूवाडी-पन्हाळ्यात कमी पडणार्‍या मतांची बेगमी कोरे यांनी केली. जोडीला मंत्री सतेज पाटील यांनी खास कार्यकर्त्यांची फौज या तालुक्यात तैनात केली. खा. संजय मंडलिक, आ. प्रकाश आबिटकर, आ. राजेश पाटील यांच्यासह माजी आमदार के. पी. पाटील, अरुण डोंगळे, ए. वाय. पाटील यांनी गडहिंग्लज, चंदगड, आजरा, राधानगरी आणि भुदरगडचा गड सांभाळला. 

माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी करवीर आणि पन्हाळा हा सत्तारूढ आघाडीचा बालेकिल्ला ठिसूळ करण्यात मोलाचा हातभार लावला. पालकमंत्री सतेज पाटील  यांनी गगनबावड्यात एकहाती यंत्रणा हाताळली. दोन्ही मंत्र्यांनी हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांतील यंत्रणा हाताळत असताना माजी खासदार निवेदिता माने यांचा पाठिंबा मिळवला. विरोधी आघाडी टीमवर्क म्हणून राबल्याने गोकुळच्या अभेद्य बालेकिल्ल्यावर विजयाचे निशाण फडकले.

बंधूप्रेमाचे पाठबळ

पालकमंत्री सतेज पाटील यांचे ज्येष्ठ बंधू डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी गोकुळ निवडणुकीत पडद्यामागे मोठी जबादारी पार पाडली. दोन्ही मंत्र्यांसह आजी-माजी आमदार,  खासदार जिल्ह्यात आघाडीचा झंझावात निर्माण करत असतानाच संजय पाटील यांनी ठरावधारकांशी संपर्कात असलेली यंत्रणा यशस्वीपणे हाताळली. संजय पाटील यांच्या बंधूप्रेमाच्या पाठबळामुळेच सतेज पाटील गोकुळची मोहीम फत्ते करू शकले.