Wed, Jun 23, 2021 01:17
चंद्रकांत पाटलांची संभाजीराजेंना विचारणा; मराठा आरक्षणप्रश्‍नी नेमके काय करणार?

Last Updated: Jun 11 2021 4:20PM

कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासंबंधीच्‍या आंदोलनात जर चालढकल करत असतील तर ते समजण्‍याइतका मराठा समाज सुज्ञ आहे. मराठा आरक्षण प्रश्‍नी नेमके काय करणार हे खा. संभाजीराजे यांनी समाजासमोर मांडावे. मराठा आरक्षणाच्‍या प्रश्‍नावर जे आंदोलन करतील त्‍यांना पाठिंबा देण्‍याची भाजपची भूमिका आहे. असे भाजपचे प्रदेश अध्‍यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोरोनावर राज्‍य सरकारने केलेल्‍या उपाययोजना आणि त्‍यावरील खर्चाची श्‍वेत पत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणीही त्‍यांनी केली.

वाचा : गायत्री कंपनीवर जप्तीची कारवाई शक्य

आ. पाटील पुढे म्‍हणाले, मराठा आरक्षणाच्‍या मागणीसाठी खा. संभाजीराजे यांनी दि. १६ रोजी मोर्चा काढण्‍याचा निर्णय जाहीर करताच आपण त्‍यांचे नेतृत्‍व मान्‍य करून या मोर्चात सहभागी होण्‍याचे त्‍याच क्षणी जाहीर केले. परंतू आता ते असे आपण बोललोच नव्‍हतो, असे म्‍हणत असतील तर त्‍यावर आपण काय बोलणार. प्रथम मोर्चा काढणार म्‍हणाले, नंतर आमदार, खासदारांना जाब विचारणार असे सांगितले. त्‍यानंतर पुणे-मुंबई लॉंग मार्च काढणार असे बोलले. नेमके काय करणार हे एकदा समाजासमोर स्‍पष्‍टपणे मांडले पाहिजे. परंतू मराठा आरक्षणाच्‍या आंदोलनाबाबत होणारी चालढकल सरकारला वाचविण्‍यासाठी आपण मदत करत आहोत का, याचा देखील विचार केला पाहिजे.

पंढरपूरच्‍या पायी वारीला बंदी घालण्‍यापेक्षा कोरोनाचे नियम पाळत दिंडी काढण्‍यास परवानगी द्यावी, अशी मागणी करून आ. पाटील पुढे म्‍हणाले, राज्‍यात कोरोनामुळे एक लाख नागरिकांचा मृत्‍यू झाला. देशाच्‍या तुलनेत मृत्‍यूचे हे प्रमाण ३३ टक्‍के आहे. हे गंभीर आहे. त्‍यामुळे लपविलेले अकरा हजार मृत्‍यू वेगळाच विषय आहे. त्‍यामुळे पाठ थोपटवून घेताना सरकारने राज्‍याची ही दूरवस्‍था कशामुळे निर्माण झाली. आपण कुठे कमी पडलो. याचे आत्‍मपरीक्षण सरकारने केले पाहिजे.

अकरा हजार मृत्‍यू का लपविली हे देखील त्‍यांनी जहीर कारावे. कोरोनाच्‍या पहिल्‍या आणि दुसर्‍या लाटकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले. सरकारचा बेफिकरपणा दिसतो आहे. कोणत्‍याही विषयाची तयारी केली नाही. महाराष्ट्रातील मुंबईबरोबरचे शहर म्‍हणून पुण्‍याकडे पाहिले जाते. परंतू सरकारने त्‍याला १० कोटी देखील दिले नाही. उलट पुणे महापालिकेने पहिल्‍या लाटेत ३५० व दुसर्‍या २०० कोटी रुपये खर्च केले. मुंबई महापालिकेने खर्च केले. सरकारने काय केले? यावर अधिवेशनात आवाज उठविण्‍यात येईल. परंतू अधिवेशन देखील कोरोनाचे कारण सांगून दोन दिवसात संपवतील. त्‍यामुळे कोरोना काळात केलेल्‍या खर्चाची श्‍वेत पत्रिका सरकारने प्रसिद्ध करावी.

वाचा : एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर येथे केली भात पेरणी

वाचा : उदयनराजे म्हणाले, ‘संभाजीराजे माझे बंधू कधीही भेटू शकतात’

वाचा : कोल्हापूर : 'काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट'