Tue, Mar 02, 2021 10:32
कोल्हापुरातून कर्नाटकात एस. टी. बस वाहतूक बंद

Last Updated: Feb 24 2021 2:10AM

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूरमधून कर्नाटकात होणारी एस.टी. वाहतूक मंगळवारी दुपारपासून बंद करण्यात आली. कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसेसही बंद झाल्या. आरटीपीसीआर तपासणी अहवाल बंधनकारक केल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे विभाग नियंत्रण रोहन पतंगे यांनी सांगितले.

अन्य राज्यांतून प्रवेश करणार्‍यांना कर्नाटक सरकारने कोरोनाचा आरटीपीसीआर तपासणी अहवाल बंधनकारक केला आहे. याचा  परिणाम एस. टी. वाहतुकीवर झाला आहे. एस.टी. प्रवाशांनाही हा नियम लागू केल्याने कोल्हापूर विभागाने कर्नाटकात होणारी वाहतूक दुपारी 12 नंतर बंद केली.

कोल्हापूरसह पुणे, रत्नागिरी आदी जिल्ह्यांतूनही कर्नाटककडे जाणारी एस.टी.ची वाहतूक कोल्हापूरपर्यंतच सुरू होती. कोल्हापुरातून दररोज बेळगाव, हुबळी, सौंदत्ती, बदामी, दांडेली, बंगळूर, सागर, कलबुर्गी आदी कर्नाटकातील शहरांसाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेस आहेत. दररोज धावणार्‍या या 30 बसेसची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

कर्नाटक महामंडळाची वाहतूकही बंद

कर्नाटकातील प्रमुख शहरांतून कोल्हापुरात तसेच रत्नागिरी, पुणे, मुंबई आदी ठिकाणी होणारी कर्नाटक परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूकही बंद करण्यात आली आहे. कर्नाटकातून राज्यात येण्यासाठी प्रवासी आहेत. मात्र, महाराष्ट्रातून कर्नाटकात जाताना प्रवासी मिळणार नाहीत तसेच त्यांना तपासणी अहवाल दाखवणे बंधनकारक केल्याने कर्नाटक परिवहन मंडळानेही वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  

स्थानिक वाहनांना अटकाव नाही

कोगनोळी नाक्यावरून निपाणी, बेळगाव आदी परिसरात ये-जा करणार्‍या वाहनांना तसेच निपाणीमार्गे आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यांत जाणार्‍या वाहनांना अटकाव करण्यात येत नव्हता. कोठे जाणार आहे, याची माहिती घेऊन ही वाहने सोडण्यात येेत होती. मालवाहतुकीसह कर्नाटकातून पुढच्या राज्यात जाणार्‍या वाहनांनाही खात्री करून सोडण्यात येत होते.

जिल्हाधिकार्‍यांचे मुख्य सचिवांना पत्र

कर्नाटकात जाणार्‍या प्रवाशांना आरटीपीसीआर तपासणी अहवाल बंधनकारक केल्याने पुणे-बंगळूर महामार्गावर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. कोगनोळी नाक्यापर्यंत जाऊन प्रवासी महाराष्ट्रात परतत आहेत. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी गर्दीही होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पत्र दिले आहे. राज्यात प्रवासाला अशी बंदी घालता येणार नाही. खबरदारी म्हणून संबंधित राज्य शासनाने प्रवाशांची तपासणी करून घ्यावी, असेही जिल्हाधिकारी देसाई यांनी स्पष्ट करत याबाबत कर्नाटक सरकारशी वरिष्ठ स्तरावर चर्चा करून तातडीने निर्णय घ्यावा, असेही देसाई यांनी या पत्रात म्हटले आहे.