Thu, Oct 29, 2020 07:29होमपेज › Kolhapur › दरोडा, लूटमार टोळ्यांतील म्होरक्यांसह 10 सराईत जेरबंद

दरोडा, लूटमार टोळ्यांतील म्होरक्यांसह 10 सराईत जेरबंद

Last Updated: Oct 18 2020 12:55AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

उचगाव (ता. करवीर) येथील रेल्वे ब्रिजवरील दरोडा आणि कोंडिग्रे (ता. शिरोळ) फाट्याजवळ झालेल्या वाटमारीप्रकरणी सराईत टोळ्यांचा स्थानिक गुन्हे अन्वेषणने शनिवारी छडा लावला. म्होरक्यांसह 10 जणांना पथकाने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून रोख रकमेसह अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोन्ही घटनांमध्ये कामगारांनी सराईत टोळ्यांना हाताशी धरून कट रचल्याचे उघड झाले. कोल्हापूर, सांगली, पुणे जिल्ह्यांसह कर्नाटकातील दरोडा, लूटमारी, चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.

उचगाव येथील व्यापारी ज्ञानराज नाडार यांना मारहाण, दरोडाप्रकरणी कामगार नारायण ऊर्फ चंद्रकांत सुरेश वडर (वय 20, रा. धोत्रे गल्‍ली, पाडळकर मार्केटजवळ), सुमीत ऊर्फ लाल्या सूर्यकांत खोंद्रे (24, धोत्री तालीमजवळ, शुक्रवार पेठ), सौरभ ऊर्फ डॅनी धनाजी खोंद्रे (20, धोत्री गल्‍ली), रोहन सुहास तडवळे (29, फिरंगाई गल्‍ली, शिवाजी पेठ, सध्या साळोखेनगर), अमित बाळासाहेब कांबळे (25, बबन काटे चाळ, स्वामी विवेकानंदनगर, सध्या, दापोली, पुणे), सौरभ संजय पाटील (20, घाटगे कॉलनी, कदमवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. टोळीचा म्होरक्या लाला खोंद्रे व रोहन तडवळे हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. टोळीतील साथीदार उमेल महम्मद तांबोळी (खडकी बाजार, चेतन सोसायटी, पुणे) पसार झाला आहे. पोलिसांचे पथक पुण्याला रवाना झाले आहे.

रोकडसह मुद्देमाल हस्तगत

सांगलीतील बालाजी टाईल्सचे मालक शेखर जयपाल सिद्धनाळे (रा. कबनूर, ता. हातकणंगले) यांना लूटल्याप्रकरणी कामगार ओंकार नंदकुमार हारूगडे (21, डेक्‍कन चौक, इचलकरंजी), सनी बाबुराव भोसले (21, जवाहरनगर, इचलकरंजी), आसिफ सलीम मुजावर (21, जवाहरनगर), साहिल हबीब फणीबंद (22, कोरोची, ता. हातकणंगले) यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने चौघांनाही पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दीड लाख रोकडसह 1 लाख 85 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

दोन्हीही तपास पथकांना बक्षीस जाहीर

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दरोड्यासह लूटमारीचा गुन्हा उघडकीला आणून गुन्हेगारांना अटक केल्याबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत, इचलकरंजीचे सहायक निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक सत्यराज घुले, अजय सावंत, महेश पाटील, अजित वाडेकर, विजय कारंडेसह पथकांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

पोलिसी खाक्यामुळे कामगारांचे लोटांगण

बलकवडे यांनी सांगितले की, उचगाव येथील व्यापारी नाडार बंधू 2 ऑक्टोबरला रात्री दुकान बंद करून दुचाकीवरून घराकडे जात असताना सुमीत ऊर्फ लाल्या खोंद्रेसह साथीदारांनी पाठलाग करून उचगाव रेल्वे ब्रिजजवळ रोखले. दोघांना बेदम मारहाण करून दीड लाखाची रोकड  लूटली होती. नाडार यांच्या दुकानातील कामगार नारायण ऊर्फ चंद्रकांत सुरेश वडर याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने म्होरक्यासह अन्य साथीदारांची नावे उघड केली. 

सराईत गुन्हेगार लाल्या खोंद्रे, तडवळे पुन्हा सक्रिय

पथकाने लाल्या खोंद्रे, रोहन तडवळेसह अन्य साथीदारांना ताब्यात घेऊन रोकडसह मोटारसायकल हस्तगत केली. कामगार नारायण वडर हा नाडार बंधूंकडे दीड वर्षापासून कामाला होता. गुन्हेगारी टोळीशी त्याचा सातत्याने संपर्क असल्याने व्यापार्‍याला लूटण्यासाठी वडरने कट रचला होता, असेही बलकवडे यांनी सांगितले.  

कबनूर येथील शेखर सिद्धनाळे यांचा सांगलीत व्यवसाय असल्याने त्यांची रोजची आर्थिक उलाढाल असते. त्यांच्याकडील कामगार ओंकार हारूगडे याने सराईत गुन्हेगारांना हाताशी धरून सिद्धनाळे यांना लूटण्याचा कट रचला. 12 ऑक्टोबरला रात्री इचलकरंजी मार्गावर कोंडिग्रे फाट्याजवळ सनी भोसलेसह साथीदारांनी त्यांना मारहाण करून 1 लाख 72 हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक विकास जाधव, महेश खोत, संजय इंगवले आदींनी टोळीचा छडा लावून संशयितांना जेरबंद केले. 

पोलिस अधीक्षकांचे व्यापार्‍यांना आवाहन!

लॉकडाऊनमुळे सहा महिने आर्थिक उलाढाली ठप्प झाल्याने गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. आर्थिक व्यवहार करताना अथवा मुद्देमालासह प्रवास करताना व्यापार्‍यांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे. मोठ्या रकमा घेऊन रात्रीचा प्रवास टाळावा. शक्यतो हे व्यवहार दिवसा करावेत, असेही ते म्हणाले.

 "