Thu, Oct 01, 2020 17:07होमपेज › Kolhapur › पूरग्रस्त 'त्या' चिमणी-पाखरांना मिळालं जीवदान!

पूरग्रस्त 'त्या' चिमणी-पाखरांना मिळालं जीवदान!

Last Updated: Aug 08 2020 11:10AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

पंचगंगा नदीला पूर आल्याने केवळ नागरिकांनाच नव्हे तर पक्ष्यांनाही त्याचा फटका बसत आहे. रुई (ता. हातकणंगले) येथील नदीरोडवरील मगदूम विहिरीलगतच्या झाडावर चिमण्यांनी पंचवीसहून अधिक घरटी बांधली आहेत. पण पुराच्या वाढत्या पाण्यामुळे त्यातील काही घरटी बुडण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे घरट्यातील पिलांबाबत पहाटेच्या सुमारास चिमण्यांची घालमेल चालू होती. शुक्रवारी पहाटे पंचगंगा जलतरण आणि मॉर्निंग वॉक मंडळाच्या सदस्यांचे त्याकडे लक्ष वेधले गेले. आपल्या पिलांच्या काळजीपोटी चिमण्यांची सुरु असलेली धडपड पत्रकार भाऊसाहेब फास्के आणि शकील मुजावर यांनी मोबाईलवर चित्रित करत ती सोशल मिडीयावर पोस्ट केली.

भाऊसाहेब फास्के यांनी 'घरटं चाललं पाण्याखाली जीव कासावीस होतो!... पूरग्रस्त आम्हीही पण लक्षात कोण घेतो!! या मथळ्याखाली पोस्ट केली आहे. ही पोस्ट माजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी धनंजय पाटील यांच्या वाचनात आली. त्यांनी लगेच कोल्हापूरच्या डिझास्टर रेस्क्यू लाईफ गार्ड सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा जीवरक्षक म्हणून परिचित असलेले दिनकर कांबळे यांच्याशी संपर्क साधत चिमण्यांच्या पिल्लांचे जीव वाचवण्याबाबत त्यांनी सूचना केली. 

याची माहिती मिळताच दिनकर कांबळे यांनी अमित पाटील, अर्जुन भोसले, सुरेश कांबळे या सहकाऱ्यांना सोबत घेत दुपारी तीन वाजता घटनास्थळ गाठले. त्यांनी पुराच्या पाण्यात उतरुन रस्सीच्या साहाय्याने अडीच-तीन तासांच्या प्रयत्नानंतर चिमण्यांची घरटी जवळपास चार फुटांनी उंचावर घेतली. यामुळे सर्वच घरट्यातील पिलांना जीवदान तर मिळालेच शिवाय चिमण्यांचा जीवही भांड्यात पडला.तरुणांच्या या टीमला तैमुर उर्फ अब्दुल मुजावर, नंदकुमार साठे यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी आवश्यक साहित्य तत्काळ उपलब्ध करुन दिले. एकूणच कोल्हापूरच्या तरुणांनी रुईपर्यंत धाव घेऊन चिमणीपाखरांविषयी दाखवलेली संवेदना निश्चितीच कौतुकास पात्र ठरली आहे.

 "