Fri, Feb 26, 2021 07:24
मतदार याद्यांवर २१८२ हरकतींचा पाऊस

Last Updated: Feb 24 2021 2:15AM

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकींतर्गत प्रभागनिहाय मतदार याद्यावर तब्बल 2 हजार 182 तक्रारी दाखल झाल्या आहेत. परिणामी, अधिकार्‍यांचेही धाबे दणाणले आहेत. हरकतीनुसार मतदारांची शोधाशोध आणि सुनावणीसाठी प्रशासनाची अक्षरशः दमछाक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने हरकतींवर लवकरच सुनावणी घेण्यात येईल. 

महापालिका निवडणुकींतर्गत प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार 16 फेब—ुवारीला प्रशासनाने प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. महापालिकेच्या 1 ते 4 विभागीय कार्यालयाबरोबरच वेबसाईटवर आणि 81 प्रभागांत नागरिकांना याद्या पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. 23 फेब—ुवारीपर्यंत सूचना व हरकतींसाठी मुदत होती. मंगळवारी एका दिवसांत तब्बल 1270 हरकती दाखल झाल्या. यात गांधी मैदान विभागीय कार्यालय 499, छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय 406, राजारामपुरी विभागीय कार्यालय 194 व छत्रपती ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय 171 हरकतींचा समावेश आहे.

मतदार याद्यात मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. एकेका प्रभागातील दोन ते अडीच हजारांवर मतदारांची नोंद दुसर्‍याच प्रभागात झाली आहे. अनेक इच्छुकांची नावेही दुसर्‍याच प्रभागात गेल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे. मतदारांतही संभ—मावस्था निर्माण झाली आहे. राजकीय पक्षांनी तर याद्या रद्द करून नव्याने कराव्यात, अशी मागणी केली आहे. परिणामी, याद्या जाहीर झाल्यापासून सूचना व हरकती सुरू झाल्या आहेत. 

प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 3 मार्चला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. 8 मार्चला मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध होईल. 12 मार्चला अंतिम प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. एप्रिल-मेमध्ये महापालिका निवडणुकीची रणधुमाळी माजेल.