Sat, Aug 08, 2020 13:37होमपेज › Kolhapur › महाडिक बावड्यात; सतेज पाटील यांच्या घरी धडक(Video)

महाडिक बावड्यात; सतेज पाटील यांच्या घरी धडक(Video)

Published On: Sep 14 2018 11:04AM | Last Updated: Sep 14 2018 9:22PMकोल्हापूर/कसबा बावडा ः प्रतिनिधी

काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री सतेज पाटील यांचे समर्थक नगरसेवक संदीप नेजदार यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांना कसबा बावड्यात फिरू देणार नाही, असा इशारा गुरुवारी दिला होता. त्यानंतर दुसर्‍या दिवशी शुक्रवारी सकाळीच महाडिक यांनी आ. पाटील यांच्या बंगल्यावर धडक दिली. ते नाहीत असे म्हटल्यावर राजारामचे माजी अध्यक्ष विश्‍वास नेजदार यांच्या घरी भेट देऊन या आव्हानाची हवाच काढून घेतली.

शुक्रवारी घडलेल्या या प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. ‘गोकुळ’च्या गुरुवारी झालेल्या करवीर तालुका संपर्कसभेत आ. पाटील यांचे समर्थक नेजदार यांना मारहाण झाली होती. त्यानंतर गुरुवारी नेजदार यांनी महाडिक यांना बावड्यात, तर ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांना ‘गोकुळ’मध्ये फिरकू देणार नाही, त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर महाडिक यांनी आज थेट पाटील यांच्यासह नेजदार यांच्या घरी जाऊन मी बावड्यात आलो आहे, असे प्रतिआव्हानच दिले.

वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर असलेल्या महाडिक यांची वेळेनुसार बसण्याची ठिकाणे ठरलेली आहेत. त्यांची गाडी 8 वाजून 10 मिनिटांनी बावड्यात दिसली. शक्यतो यावेळी ते बावड्यात दिसत नाहीत. त्यामुळे अनेकांना आश्‍चर्य वाटले. ते स्वतः गाडी चालवत होते. मुख्य रस्त्याने फायर ब्रिगेडमार्गे ते थेट आ. सतेज पाटील यांच्या बंगल्यावर पोहोचले. बंगल्याचे गेट उघडे पाहून त्यांनी गाडी थेट आतच घातली. गेटवरील कर्मचार्‍याला त्यांनी बंटीसाहेब आहेत का, असे विचारले. या कर्मचार्‍यांनी साहेब रात्री रेल्वेने पुण्याला गेल्याचे सांगितले. त्यावेळी महाडिक यांनी याच कर्मचार्‍याला आ. पाटील यांना फोन लावण्यास सांगितले; पण फोनला प्रतिसाद न आल्याने आपण येऊन गेल्याचा निरोप साहेबांना द्या, असे सांगत महाडिक यांनी गाडी रिव्हर्स घेतली. तेथून ते पाटील यांची सत्ता असलेल्या श्रीराम सोसायटीत गेले; पण तिथेही कोणी नव्हते. त्यानंतर पुन्हा मुख्य रस्त्यावरून पिंजार गल्लीमार्गे त्यांनी नेजदार यांचे घर गाठले.

गुरुवारी ज्यांना आपण बावड्यात फिरू देणार नाही असे आव्हान दिले होते, तेच महाडिक प्रत्यक्ष घरात आल्याचे पाहून नेजदार कुटुंबीयही अवाक् झाले. यावेळी घरात नेजदार यांच्यासह त्यांचे पुतणे माजी स्थायी समिती सभापती डॉ. संदीप, मुलगा प्रदीप, भाऊ पंडित आदी होते. या सर्वांनी महाडिक यांनी आत बोलवले. महाडिक यांनी सुरुवातीलाच ‘गोकुळ’च्या सभेत तुमच्या बाबतीत घडलेला प्रकार योग्य नसल्याचे नेजदार यांना सांगितले. त्या घटनेनंतर मी कालच तुम्हाला भेटायला येणार होतो; पण काही कारणाने येऊ शकलो नाही, असेही सांगितले. तुमच्या बाबतीत फार मोठी चूक झाली आहे. तुम्हाला मी बर्‍याच वर्षापासून ओळखतो, तुम्ही माझ्यासोबत होता, ‘राजाराम’चे अध्यक्ष म्हणून तुम्ही काम केले आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे. त्यामुळेच मी तुमची भेट घ्यायला आलो, असेही महाडिक म्हणाले.

आम्हाला हा प्रकार माहीत नव्हता. वडिलांनी फोन केला असता तरी काहीतरी घडले असते, असे नेजदार यांचा मुलगा प्रदीप यावेळी म्हणाला. त्यावर महाडिक म्हणाले,  करायला काही अवघड नाही; पण नेजदार यांच्या बाबतीत चूकच झाली आहे. मी विश्‍वास पाटील यांनाच घेऊन येणार होतो; पण ते बाहेर गेले आहेत. ज्या मुलांनी हा प्रकार केला, त्याबद्दल विश्‍वास पाटील यांनी दिलगिरी व्यक्‍त करायला हवी होती. तुम्ही चुकला म्हणून संचालकांनाही मी सांगितले आहे. सुमारे 20 मिनिटे महाडिक हे नेजदार यांच्या घरी होते. त्यावेळी श्रीराम सोसायटीचे काही संचालकही या ठिकाणी आले. महाडिक नेजदार यांच्या घरी आल्याची माहिती वार्‍यासारखी बावड्यात पसरली. त्यामुळे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी नेजदार यांच्या घरासमोर गर्दी केली. या भेटीनंतर महाडिक राजाराम कारखान्यावर निघून गेले.

मल्टिस्टेटचा हट्ट का? ः नेजदार

तुम्ही संघाचे नेतृत्व करता, एखादी गोष्ट समाजाला खटकत असेल, तर तुम्ही तीच गोष्ट रेटून कशी नेता. ‘गोकुळ’ तुमच्यासाठी मल्टिस्टेट करत आहात का, सभासदांसाठी करणार असाल तर आम्हाला तो नको आहे. बाहेरून दूध आणून संघाचा फायदा झाला का, संघ गिळंकृत केला जाईल असे आम्हाला वाटते, असे नेजदार यांनी महाडिक यांना सुनावले. याबाबत मी सांगू शकतो; पण ज्यांनी ती सांगायला पाहिजे होती, त्यांनी सांगितली नाही. मल्टिस्टेटची पोटनियम दुरुस्ती मराठीत छापल्यानंतर हा विषय संपायला पाहिजे होता, असे महाडिक यावेळी म्हणाले.

होय, महाडिक आले होते ः डॉ. नेजदार

महादेवराव महाडिक सकाळी घरी आले होते, त्यांनी घडलेला प्रकार चुकीचा असल्याचे सांगितले. नेजदार यांच्याबाबतीत हा प्रकार व्हायला नको होता, असेही महाडिक म्हणाले. याबाबत संचालकांसह मारहाण करणार्‍यांना मी झापल्याचेही ते म्हणाले, अशी माहिती नेजदार यांचे पुतणे नगरसेवक डॉ. संदीप नेजदार यांनी दिली.

नेजदार आमचे जवळचे म्हणून भेटलो

विश्‍वास नेजदार हे पूर्वी आमच्यासोबत होते, त्यांनी मी नेतृत्व करत असलेल्या राजाराम कारखान्याचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यांना ‘गोकुळ’च्या सभेत झालेली माराहाण चुकीची आहे. हा प्रकार योग्य नाही. गुरुवारीच मी त्यांची भेट घेणार होतो. विश्‍वास पाटील यांनाच घेऊन येणार होतो; पण झाला विषय संपावा म्हणून त्यांची आज भेट घेतल्याचे महादेवराव महाडिक यांनी सांगितले. 

मग ते मुंबईला कसे जाणार ः महाडिक

आ. पाटील यांच्या बंगल्यावर का गेला होता, असे विचारल्यावर महाडिक म्हणाले, लोकशाही आहे का नाही याचा जाब त्यांना विचारणार होतो. याला बंदी, त्याला बंदी, ही लोकशाही आहे, हे चालणार नाही. असेच होणार असेल, तर मग ते मुंबईला कसे जाणार, असा प्रतिप्रश्‍नही महाडिक यांनी केला.

विश्‍वास पाटील यांचा माफीनामा

या घडामोडीनंतर ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी नेजदार यांच्याबाबतीत घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्‍त केली. ‘गोकुळ’च्या करवीर तालुका संपर्कसभेत प्रश्‍नोत्तरावेळी राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्‍वास नेजदार यांना चुकून धक्‍काबुक्‍की झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्‍त करत असल्याचे पाटील यांनी यासंदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

तत्काळ पोलिस दाखल

सोशल मीडियाच्या माध्यमातून महाडिक हे सतेज पाटील व नेजदार यांच्या घरी आल्याची माहिती वार्‍यासारखी शहर व जिल्ह्यात पसरली. या घटनेची गंभीर नोंद पोलिसांनीही घेतली. क्षणार्धात पाटील यांच्या बंगल्याबाहेर पोलिसांचा ताफा तैनात झाला. काही झालेले नाही, असे समजल्यानंतर हे पोलिस नेजदार यांच्याही घरी गेले.

नाष्टा अर्धवट सोडूनच महाडिक बावड्यात

रोज सकाळी सहा अंडी व वाटीभर लोणी हा महाडिक यांचा नाष्टा असतो. नाष्टा करत असताना त्यांनी वृत्तपत्रातील त्यांना आव्हान दिलेल्या बातम्या वाचल्या. बातमी वाचत असतानाच त्यांनी नाष्टा अर्धवट सोडूनच बावडा गाठले.

नेहमीच्या स्टाईलमध्ये महाडिक नेजदार यांच्या घरी पोहचले. तेथे त्यांनी घडलेला प्रकार निंदनीय असल्याचे सांगितले. झाले हे चुकीचे असल्याची कबुली त्यांनी दिली. लोकशाही मार्गाने काम करू, असे सांगून कालच येणार होतो असेही स्पष्ट करून झालेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. महाडिक बावड्यात आल्याचे पाहून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी नेजदार यांच्या घरासमोर गर्दी केली. आणि सकाळपासूनच जिल्ह्याच्या राजकरणावर चर्चा सुरू झाली. 

महादेवराव महाडिक घरी आले होते. त्यांनी विश्‍वास नेजदार यांना झालेल्या मारहाणीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. घडलेला प्रकार निंदणीय असल्याचे सांगितले. 
 डॉ.संदीप नेजदार

लोकशाही आहे, घडलेला प्रकार चुकीचा होता म्हणून सतेज पाटील यांच्या घरी गेलो होतो. पण ते पुण्याला असल्यामुळे नेजदारांच्या घरी जावून निंदनीय प्रकार झाल्याचे सांगितले आहे. कार्यकर्त्यांना समज दिली जाईल, असेही सांगितले आहे. 
- महादेवराव महाडिक