Thu, Oct 29, 2020 07:18होमपेज › Kolhapur › महाडिक कुटुंब कोरोनामुक्त; शौमिका महाडिकांचे भावनिक पत्र

महाडिक कुटुंब कोरोनामुक्त; शौमिका महाडिकांचे भावनिक पत्र

Last Updated: Sep 25 2020 7:33PM

महाडिक कुटुंबकोल्हापूर पुढारी डेस्क

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यात लहानापासून मोठ्यापर्यंत ते सामान्यापासुन ते नेत्यानाही कोरोनाने सोडले नाही. माजी आमदार महादेवराव महाडीक (आप्पा) यांनाही कोरोनाची लागण झाली. याचबरोबर त्यांच्या पत्नी आणि माजी आमदार अमल महाडीक यांनाही कोरोनाची लागण झाली. यावर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडीक यांनी कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहत आभार मानले आहे.   

शौमिका महाडिक यांनी फेसबुक पोस्ट करत म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून आपल्यासाठी म्हणावा तसा वेळ देता आला नाही त्याबद्दल सर्वप्रथम माफी मागते. नेहमी काही महत्वाचा विषय असेल, भूमिका मांडायच्या असतील तर मी असा एखादा लेख लिहून कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. आज तसं काही विशेष कारण नाही. पण या महिन्याभरात घरचे काही सदस्य कोरोनाबाधित झाल्याने जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांना, हितचिंतकाना काळजी लागून राहिली होती. प्रत्येकाचे फोन घेणे, मेसेजेसना रिप्लाय करणे शक्य नसल्याने सर्वांना एकत्रित संदेश देण्यासाठी या माध्यमातून संवाद साधते आहे. 

आपल्याला कल्पना आहे की मागच्या महिन्यात पहिल्यांदा आप्पांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांची तब्बेत अगदी ठणठणीत होती पण तरी काळजी लागलेली असतेच. त्यातून आम्ही सावरतो न सावरतो तेवढ्यात पुढच्या २-४ दिवसात आईंचासुद्धा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तरी वेळेवर निदान झाल्याने व योग्य उपचार घेतल्याने दोघांनाही कसला त्रास नव्हता. वरचेवर डॉक्टरांशी बोलणं सुरूच होतं. या सगळ्या गोंधळामध्ये आप्पांची विचारपूस करण्यासाठी म्हणून लोकांचे इतके फोन येत होते की सगळ्यांना उत्तर देऊन अक्षरशः मी थकून गेले, पण तुमचे प्रेम पाहून तितकाच मानसिक आधारही मिळाला..

आप्पा आणि आई बरे होऊन १- २ दिवसांत घरी परतणारच होते इतक्यात अमल साहेबांना त्रास सुरू झाला. चाचणी केली असता त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह! साहेबांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करावे लागले. या मधल्या काळात थोडी घाबरले होते पण मनात भीती असली तरी मुलं लहान असल्याने त्यांच्यासमोर धीट राहणंही गरजेचं होतं.. अश्या दुहेरी परिस्थितीशी तोंड देण्यातच हा पूर्ण महिना निघून गेला.

खासगी आयुष्यात संकटे आली तरी सामाजिक जीवनामध्ये पक्षाचं माझ्याकडे असलेलं पद, जिल्हा परिषद सदस्यत्व याही जबाबदाऱ्या झटकून चालणार नव्हतं. त्यामुळे शक्य होईल तसं या गोष्टींकडेही लक्ष देत होते. महिनाभर थोडी ओढाताण झाली हे खरं आहे पण आता शेवटी सगळेच बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत. सगळं काही पुन्हा सुरळीत झालं यासाठी देवाचे आभार मानावेत तितके थोडे आहेत!

कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत आहे हे आपण सगळेच जाणतो. कोणाला काही लक्षणे असतील तर अजिबात दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांकडे जा, योग्य उपचार घ्या. दुर्लक्ष करण्याने तुमचे स्वतःचे तर नुकसान होईलच, शिवाय तुमच्यामुळे आजूबाजूच्या लोकांनाही याची बाधा होऊ शकते. त्यामुळे माझी विनंती राहील की सर्व नियमांचे पालन करा व प्रत्येकाने स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या.

या महिन्याभरामध्ये जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्यविषयक अनेक तक्रारी आल्या, त्या-त्या वेळेस आवश्यक ती सर्व मदत करण्याचा आम्ही प्रयत्न केला. काही गोष्टींवर आम्ही भूमिका मांडाव्यात असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता तेही लक्षात आहे. या राजकीय गोष्टींना योग्य वेळी, योग्य ठिकाणी उत्तरं दिली जातील. त्याची कोणी चिंता करू नये, असं मला वाटतं. तरीही आपली काही मतं असतील, कोणाला काही मदत लागत असेल तर जरूर कळवावे. ईश्वरकृपेने महाडिक परिवाराचे आम्ही सर्व सदस्य आता पुन्हा नवी ऊर्जा घेऊन तुमच्या सेवेत हजर आहोत, इतकीच फक्त आठवण करून देते आणि थांबते...

 "