Mon, Jan 18, 2021 18:42
कोल्हापूर : दिशादर्शक आणि स्पीडब्रेकर नसल्याने उत्तूरजवळ अपघात, युवक ठार 

Last Updated: Jan 14 2021 3:38PM
उत्तूर (ता. आजरा) : पुढारी वृत्तसेवा

उत्तूर (ता. आजरा) येथील बायपास रिंग रोडवरील स्मशान शेडजवळ गुरूवारी पहाटे चार वाजता एका कारचा अपघात झाला. या अपघातात कार पलटी झाली. या अपघातात रोहित रमाकांत कुडाळकर (वय २५ रा. कुंभारवाडी ता. कुडाळ) हा जागीच ठार झाला. तर कारमधील इतर दोघे जखमी झाले असून कारचे अंदाजे सात लाखाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी उत्तूर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

वाचा : कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्राबाहेर भानामती, गुलाल, अंडी, तांदूळ आणि बरेच काही...

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कुडाळ तालुक्यातील रोहित रमाकांत कुडाळकर, ओमकार मेघनाथ वालावलकर, जगन्नाथ सूर्यकांत पेडणेकर हे मित्र आपल्या कारने कुडाळला गुरूवारी परतत होते. यावेळी पहाटे चारच्या सुमारास त्यांची गाडी उत्तूर येथील बायपास रिंग रोडवरील स्मशान शेडजवळ आली असता पहाटे चार वाजता अपघात झाला. हा अपघात ओंकार मेघनाथ वालावलकर (वय २४) याचा गाडीवरील ताबा सुटल्याने झाला. त्यानंतर ती कार भरधाव वेगाने सिमेंटच्या पोलला धडकली आणि ती रोडच्या बाजूला असलेल्या चरीमध्ये पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की कार जवळजवळ शंभर ते सव्वाशे फूट फरफटत जाऊन चरीमध्ये पलटी झाली. या झालेल्या भीषण अपघातात रोहित रमाकांत कुडाळकर (वय २५ रा. कुंभारवाडी ता. कुडाळ) हा जागीच ठार झाला. तर ओमकार मेघनाथ वालावलकर (वय ३०), रघुनाथ बाबू कुंभार (वय ३० दोघे ही रा. कुंभारवाडी सर्वजण कुडाळ) हे दोघे जखमी झाले आहेत. या अपघाताची फिर्याद बाबुराव सुभाष परब (वय २९ रा. नाबरवाडी ता. कुडाळ) यांनी दिली असून पुढील तपास सहा. फौजदार बी. एस. कोचरगी करत आहेत.

वाचा : सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत लसीकरण

स्पीड ब्रेकर असता तर अपघात झाला नसता 

उत्तूर हे कोकणाचे प्रवेशद्वार मानले जाते. या राज्य मार्गावरील वाहतुकीचे नियम कडक होणे गरजेचे आहे. या मार्गावरील  स्मशान शेड व महालक्ष्मी मंदिर चौक हे अपघाताचे हॉटस्पॉट बनले आहेत. त्यामुळे या स्पॉटला स्पीड ब्रेकरसह दिशा दर्शक असणे खूप गरजेचे आहे. मात्र या ठिकाणी स्पीड ब्रेकर अथवा दिशा दर्शक यापैकी काहीच नसल्याने हा अपघात झाल्याची चर्चा सुरू होती. 

तसेच या ठिकाणी स्पीड ब्रेकर बनवावा अशी वेळोवेळी ग्रामस्थानी मागणी करून देखील स्पीडब्रेकर बनवला गेला नाही. त्यामुळे या ठिकाणी बरेच अपघात झाले आहेत. आजचा हा अपघात सुद्धा येथे स्पीड ब्रेकर नसल्यानेच झाला. 

वाचा : कोल्हापूर शहरातील 11 हजारांवर आरोग्य कर्मचार्‍यांना लस देणार

दोन दिवसांत चार अपघात 

उत्तूरजवळ मुम्मेवाडी येथे ट्रक पलटी झाला. त्यानंतर संध्याकाळी बायपास रोडवर मोटरसायकल अपघात झाला. रात्री उत्तूर स्टँडजवळ ट्रॅक्टर व एसटी बसची धडक झाली. त्यामुळे कालचा दिवस हा अपघातांचा दिवस होता.