Thu, Oct 01, 2020 18:53होमपेज › Kolhapur › शिवसेनेकडून कर्नाटक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

शिवसेनेकडून कर्नाटक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

Last Updated: Aug 09 2020 1:37AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा  

 कर्नाटक सरकारने बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावातील छत्रपती शिवरायांचा पुतळा एका रात्रीत काढला. हा पुतळा पुन्हा सन्मानाने आहे त्या जागी विराजमान करा, अन्यथा कर्नाटकात येऊन मस्ती जिरवू, असा सज्जड इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कर्नाटक सरकारला दिला. या घटनेचा निषेध करीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेच्या वतीने   कर्नाटक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘कर्नाटक सरकारचा धिक्‍कार असो’, ‘कर्नाटक शासनाची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले, कर्नाटक सरकारकडून अनेक वर्षे सीमाभागातील मराठी माणसांची गळचेपी केली जाते. आजही कर्नाटक प्रशासन अखंड हिंदुस्थानचे दैवत असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत असेल  तर कोल्हापुरात एकाही कानडी माणसाला राहू देणार नाही. केंद्रात आणि कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. भाजपचे जिथे सरकार आहे तिथे शिवरायांचा अवमान करण्याचे कृत्य होत आहे. भाजप सरकारने हे वेळीच रोखावे, अन्यथा कोल्हापुरातील शिवसैनिक शांत बसणार नाहीत. 

शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी,  सीमा भागातील मराठी माणसावर दडपशाही करण्याचे प्रकार कोल्हापूर शिवसेनेने अनेक वेळा उधळून लावले असून,  जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा   दिला.
यावेळी दीपक गौड, रविभाऊ चौगुले, अरुण सावंत, जयवंत हारुगले, रणजित जाधव, किशोर घाटगे, प्रकाश सरनाईक, धनाजी दळवी, सुनील जाधव, अजित गायकवाड, मंदार तपकिरे, सचिन भोळे, राजू काझी, विक्रम पवार, गजानन भुर्के, सनी अतिग्रे, सुशील भांदिगरे,  प्रथमेश भालकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी दै. ‘पुढारी’ खंबीरपणे उभा

कर्नाटकात मराठी बांधवांवर होणार्‍या अन्यायाविरोधात दैनिक ‘पुढारी’ने वेळोवेळी आवाज उठविला आहे. सीमावासीयांचे प्रश्‍न केंद्र शासनापर्यंत पोहोचविण्यापासून त्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी दै. ‘पुढारी’ नेहमीच अग्रभागी राहिला आहे. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव आणि व्यवस्थापकीय संपादक डॉ.  योगेश जाधव यांनी सीमाबांधवांना पाठबळ दिले असून, दै. ‘पुढारी’ सीमावासीयांच्या पाठीशी असल्याचेही राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. 

 "