Mon, Sep 28, 2020 06:47होमपेज › Kolhapur › पंचगंगेच्या महापुराला उतार

पंचगंगेच्या महापुराला उतार

Last Updated: Aug 09 2020 1:23AM

file photoकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

पंचगंगेला आलेल्या महापुराला उतार सुरू झाला आहे. शनिवारी पहाटेपासून पंचगंगेची पातळी दिवसभरात एका फुटाने घटली आहे. त्यामुळे शहरातील काही भागात घुसलेले पाणीही ओसरत आहे. पावसाचा जोर कमी झाला आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे सकाळी बंद झाले. यामुळे कोल्हापूरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने गेल्या चार दिवसांपासून पूरस्थिती गंभीर झाली होती. पंचगंगेचे धोक्याच्या पातळीवर वाढत जाणारे पाणी आणि राधानगरी धरणाचे उघडलेले चार दरवाजे, यामुळे शहरवासीयांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पावसाचा जोर कायम राहिल्यास कोल्हापुरातील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता होती. मात्र, कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग शुक्रवारपासून 1 लाख 80 हजार क्युसेक्सपर्यंत वाढवण्यात आला. तो शनिवारी 2 लाख 20 हजारांपर्यंत नेण्यात आला. यामुळे शुक्रवारी दिवसभर स्थिर राहिलेल्या पुराला शनिवारपासून उतार सुरू झाला.

शुक्रवारी रात्री बारा वाजता पंचगंगेची पातळी 44 फूट 10 इंचांपर्यंत गेली होती. मध्यरात्रीनंतर ती कमी होण्यास सुरुवात झाली. शनिवारी सकाळी सहा वाजता ही पातळी 44 फूट 8 इंच होती. सायंकाळी 7 वाजता ती 44 फूट 1 इंचांपर्यंत कमी झाली होती. रात्री दहा वाजता पंचगंगेची पातळी 44 फुटांपर्यंत खाली आली. शनिवारी रात्री 11 वाजता पाणी पातळी 43 फूट 11 इंच इतकी झाली. पाणी पातळी कमी होत गेल्याने कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आलेले पाणीही कमी होत आहे. उद्या, रविवारी दुपारपर्यंत पाणी पातळी आणखी कमी होऊन हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे आज बंद झाले. पहाटे साडेपाच वाजता सहाव्या क्रमांकाचा, तर सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी तिसर्‍या क्रमांकाचा दरवाजा बंद झाला. धरणाचे चार आणि पाच हे दोनच दरवाजे सध्या खुले आहेत. त्यातून 2 हजार 856 क्युसेक्स, तर वीजनिर्मितीसाठी 1 हजार 400 क्युसेक्स असे एकूण 4 हजार 256 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा कमी झालेला जोर आणि धरणातून कमी झालेला विसर्ग यामुळे पंचगंगेची पाणी पातळी आणखी वेगाने कमी होण्याची शक्यता आहे.

वारणा धरण शनिवारी सकाळी 86 टक्के भरले आहे. त्यातून 6 हजार 500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दूधगंगेतूनही 4 हजार 100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. यासह कासारी, कडवी, कुंभी, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, कोदे या धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. मात्र, पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे हा विसर्ग कमी होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर शहरातील पूर उतरण्यास सुरुवात झाली असली, तरी हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांत पंचगंगेच्या पातळीत काहीशी वाढ होऊ लागली आहे. पावसाचा जोर वाढला नाही आणि धरणांतील विसर्ग कमीच राहिला, तर या दोन तालुक्यांतही रविवारपासून पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात होईल, अशी शक्यता आहे.

जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 34.47 मि.मी. पाऊस झाला. गगनबावड्यात अतिवृष्टीच झाली. तिथे 97.50 मि.मी. पावसाची नोंद झाली.हातकणंगले तालुक्यात 7.13 मि.मी., शिरोळमध्ये 4.71 मि.मी., पन्हाळ्यात 31.86 मि.मी., शाहूवाडीत 33 मि.मी., राधानगरीत 44.67 मि.मी., करवीरमध्ये 15.73 मि.मी., कागलमध्ये 17.57 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 14 मि.मी., भुदरगडमध्ये 34 मि.मी., आजर्‍यात 50.75 मि.मी., तर चंदगडमध्ये 62.67 मि.मी. पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. तुळशी, कुंभी, पाटगाव, घटप्रभा, जांबरे आणि कोदे या सहा धरण क्षेत्रांत 100 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला. उर्वरित आठ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 100 मि.मी.पेक्षा कमी पाऊस झाला. पाटगाव धरण परिसरात सर्वाधिक 190 मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वात कमी पाऊस चिकोत्रा धरण परिसरात 45 मि.मी. इतका झाला.

कोल्हापूर शहरात तैनात करण्यात आलेल्या ‘एनडीआरएफ’च्या पथकानेही आज सकाळी पूरस्थितीची पाहणी केली. शिवाजी पुलासह आंबेवाडी, चिखली परिसरात जाऊन पथकाने पाणी शिरलेल्या भागाची पाहणी केली. तेथील नागरिकांशी त्यांनी चर्चाही केली. पावसाचा जोर वाढला, त्यानंतर पूरस्थिती जरी गंभीर झाली, तरी बचावकार्यासाठी पथक सज्ज असल्याची ग्वाही नागरिकांना यावेळी त्यांनी दिली.

85 बंधारे पाण्याखाली

जिल्ह्यातील बहुतांशी सर्व नद्यांची पाणी पातळी कमी होत आहे. यामुळे पाण्याखाली गेलेले बंधारेही कमी होत आहेत. दिवसभरात आणखी दहा बंधार्‍यांवरील पाणी ओसरल्याने त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. जिल्ह्यात अद्याप 85 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

‘अलमट्टी’तून 2.20 लाख क्युसेक्स विसर्ग

धरणात 1.80 लाख क्युसेक्सची आवक

जमखंडी ः कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पुराचे कारण मानले गेलेल्या अलमट्टी धरणातून शनिवारी 2 लाख 20 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. या धरणात 1 लाख 80 हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. शुक्रवारच्या तुलनेत हा विसर्ग 40 हजार क्युसेक्सने वाढविण्यात आला आहे.

हिप्परगी धरणात 1 लाख 75 हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत असून, तेवढाच विसर्ग ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याची फूग कमी होण्याच मदत झाली आहे.अलमट्टीतून विसर्ग वाढविल्यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी कमी होत आहे. पावसाने उघडीप दिली आहे. अलमट्टीचा वाढविलेला विसर्ग व पावसाची उसंत यामुळे पुराचा धोका कमी झाला आहे.

 "