Sat, Aug 15, 2020 16:00होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : आजरा आगाराला चार महिन्यात साडेचार कोटींचा तोटा

कोल्हापूर: आजरा आगाराला ४.४६ कोटींचा तोटा

Last Updated: Aug 01 2020 3:56PM
सोहाळे (कोल्हापूर) ः पुढारी ऑनलाईन

कोरोना महामारीचा एस. टी.लाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. पाच महिन्यापुर्वी थांबलेली एस.टी. ची चाके आजही रुळावर आलेली दिसत नाहीत. यातून आजरा आगारालाही सुट मिळालेली नसून गेल्या साडेचार महिन्यात केवळ २ लाख ६८ हजार ९१७ कि.मी. एस. टी. धावली आहे. यामुळे तब्बल ४ कोटी ४६ लाख ३४ हजार ६७६ रुपयांचा संचित तोटा आगाराला झाला आहे. 

एस.टी.च्या स्थापनेपासून प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य घेवून बंदचा अपवाद वगळता लालपरीची चाके राज्यातील रस्त्यांवर अहोरात्र फिरत होती. मात्र कोरोना विषाणू संसर्ग सुरु होताच या चाकांना ब्रेक लागला. कोरोना संसर्गाच्या धास्तीने तब्बल दोन महिने एसटीची सेवा पुर्णपणे बंद होती. दरम्यान मध्यंतरी लॉकडाऊनमध्ये थोडीशी शिथीलता मिळाल्यानंतर प्रवाशांची सेवा करण्यासाठी एस.टी. अधिकारी व कर्मचार्यांनी उत्साहाने गाड्यांचे नियोजन केले.

बससेवा सुरु झाल्यानंतर पंधरा दिवसानंतर काही प्रवाशांनी एस. टी. मधून प्रवास केला. मात्र जास्त करुन या बसफेर्‍या उत्पन्नापेक्षा खर्चच जादा झाल्याने तोट्यात फेऱ्या माराव्या लागल्या. मार्च ते जुलै दरम्यान गतवर्षी मार्च महिन्यात ९५ लाख ६८ हजार ३१५ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर यंदा ६० लाख १३ हजार ५६१ रुपयांचे तोटा झाला. गतवर्षी एप्रिल महिन्यात १ कोटी ६ लाख ६९ हजार २१ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर यावर्षी एप्रिल महिन्यात पुर्णपणे बससेवा बंद असल्याने १ कोटींवर रुपयांचा तोटा झाला आहे. गतवर्षी मे महिन्यात १ कोटी ३५ लाख ८१ हजार ७२६ रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर यंदा याच महिन्यात केवळ २ हजार १४२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. म्हणजेच १ कोटी ३५ लाख २७ हजार ७७८४ रुपयांचा तोटा झाला आहे. 

गतवर्षी जून महिन्यात १ कोटी १० लाख २६ हजार ३७० रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर यंदा याच महिन्यात केवळ २ लाख ६८ हजार ४६१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. म्हणजेच १ कोटी ७ लाख ५७ हजार ९०९ रुपयांचा तोटा झाला आहे. गतवर्षी जुलै महिन्यात (दि. १९ तारखेपर्यंत) ६३ लाख ४४ हजार ७७१ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर यंदा याच कालावधीत केवळ २ लाख ९ हजार २६३ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. म्हणजेच ५८ लाख ५४ हजार ८७२ रुपयांचा तोटा झाला आहे. एकूणच मार्च ते १९ जुलै अखेरच्या गेल्या साडेचार महिन्यात गतवर्षी आजरा एस. टी. १७ लाख ७६ हजार २५१ किलो मीटर धावली होती. पण यंदा याच कालावधीत केवळ २ लाख ६८ हजार ९१७ कि.मी. एस. टी. धावली आहे. म्हणजे १५ लाख ७ हजार ३३४ कि.मी. अंतर कमी धावली आहे. तर याच कालावधीत गतवर्षी ५ कोटी ११ लाख २८ हजार १०३ उत्पन्न मिळाले होते. तर यंदा केवळ ६४ लाख ९३ हजार ४२७ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ

एस. टी. कर्मचार्‍यांना माहे मार्चचे वेतन ७५ टक्के मिळाले असून एप्रिल महिन्याचे वेतन पुर्ण मिळाले. त्यानंतर मे महिन्याचे वेतन ५० टक्के मिळाल्यानंतर त्यानंतरच्या महिन्याचे वेतन झाले नाही. मार्च व मे महिन्याचे वेतन कपात केल्याने कर्मचारी आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच जून महिन्याच्या वेतनाबाबत अजून काय हालचाल नसल्याने एस. टी. कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे.