Mon, Apr 12, 2021 03:45
काळभैरी मंदिर पाच मार्चपर्यंत दर्शनासाठी बंद, पालखी सोहळ्यासह यात्राही रद्द

Last Updated: Feb 26 2021 2:37AM

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र-कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे येथील काळभैरवाची यात्रा तसेच पूर्वसंध्येला होणारा पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी झाला. ही यात्रा १ मार्च रोजी होणार होती. पोलिस प्रशासन, महसूल विभाग तसेच मानकर्‍यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. 

अधिक वाचा : कोल्हापूरच्या लवंगी मिरचीनंतर आता लालेलाल भेंडीची चर्चा! देशातील पहिलाच प्रयोग

दरम्यान पालखी सोहळा केवळ मानकर्‍यांच्या उपस्थितीत पार पडणार असून, पालखी ट्रकमधून काळभैरी डोंगराकडे जाणार आहे. यावेळी कोणालाही प्रवेश दिला जाणार नसून, रविवारचा आठवडी बाजारही रद्द करण्यात आला आहे. पालखी तसेच काळभैरी डोंगरावर केवळ धार्मिक विधी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. शनिवार (दि. २७) च्या रात्रीपासून २ मार्च रात्रीपर्यंत एक कि. मी. परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात येणार आहेत. तर मंदिर पाच मार्चपर्यंत दर्शनासाठी बंद राहणार आहे.

अधिक वाचा : राजाराम साखर कारखान्याचे ते सभासद अपात्रच

दरवर्षी काळभैरी यात्रेला पाच लाखांहून अधिक भाविक दर्शनाला येत असतात. तर आदल्या दिवशी सायंकाळी होणार्‍या पालखी सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्वाला यावेळी बंदी घालण्यात आली आहे. प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील काळभैरी मंदिरात रविवारी सायंकाळी केवळ अकरा लोकांच्या उपस्थितीत पालखी पूजा व इतर विधी होणार आहे. त्यानंतर ट्रकमधून पालखी मंदिराकडे जाणार आहे. यावेळी केवळ सहा लोक उपस्थित राहतील. पायथ्यापासून डोंगरापर्यंत पालखी नेण्यासाठी दहा लोकांना परवानगी असून, मुरगूडहून येणार्‍या पालखीसोबत केवळ चार लोकांना परवानगी देण्यात येणार आहे. शासकीय पूजाही सात लोकांच्या उपस्थितीत होणार असून यावर्षी दंडवतांना बंदी घालण्यात आली आहे.

अधिक वाचा : कागल : कापशी, बाळेघोल परिसरात जंगली हत्तीचा धुमाकूळ (video)

भाविकांनी कोणत्याही परिस्थितीत मंदिराकडे दर्शनाला येऊ नये, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी केले असून, तहसिलदार दिनेश पारगे यांनी केवळ पासधारी ४० लोकांना त्या त्या वेळी प्रवेश देण्यात येणार आहे. अन्यवेळी या परिसरात कोणीही फिरकू नये, असे आवाहन केले आहे. याबैठकीला गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर उपस्थित होते.