Sun, Aug 09, 2020 14:33होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : आधार नोंदणी यंत्रणा ठप्प झाल्याने गरजूंची गैरसोय

कोल्हापूर : आधार नोंदणी यंत्रणा ठप्प झाल्याने गरजूंची गैरसोय

Last Updated: Jul 13 2020 3:28PM

संग्रहित छायाचित्रसोहाळे (कोल्हापूर) : सचिन कळेकर

गेल्या काही महिन्यांपासून आजरा तालुक्यातील आधार नोंदणी यंत्रणा कोलमडली असून याचा नाहक त्रास गरजूंना भोगावा लागत आहे. गेल्या सहा महिन्यापासून पोस्ट कार्यालयात सुरु असलेली आधार नोंदणीही बंद झाल्याने सध्या तालुक्यातील आधार नोंदणी यंत्रणा पुर्णपणे ठप्प झाली आहे. आधार नोंदणी केंद्र बंद असल्याने शेतकर्‍यांसह बँक ग्राहकांची गैरसोय होत असून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यात आधार नोंदणी लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी तालुकावासियांमधून होत आहे.

वाचा : 'कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन नाही'

शेतकरी सन्मान योजना, बँक खाते उघडणे, अंगणवाडी, शाळा यासह इतर शासकीय कामाकरीता आजरा शहरात आपले सरकार केंद्राच्या चार ठिकाणी आधार नोंदणी केली जात होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे गेल्या वर्षभरापासून केंद्र चालकांच्या आधार नोंदणीच्या मशनरी संबंधित विभागाने ताब्यात घेवून आधार नोंदणी बंद केली आहे. त्यानंतर आधार नोंदणी पोस्ट कार्यालयात सुरु करण्यात आली. इतर केंद्रावरील आधार नोंदणी बंद झाल्याने आधार नोंदणीसह त्या संदर्भातील इतर कामांसाठी पोस्ट कार्यालयात गर्दी होवू लागली. पोस्ट कार्यालयामध्ये आधार नोंदणीकरीता स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने हे काम करताना पोस्टातील आहे. त्या कर्मचार्‍यांना कामाचा ताण पडू लागला. परिणामी गरजूंना आधार नोंदणीची प्रतिक्षा करावी लागली. दरम्यान मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोना महामारीचे संकट आले आणि सुरु असलेली पोस्टातील आधार नोंदणीही बंद झाली. 

गेल्या पाच ते सहा महिन्यापासून तालुक्यातील आधार नोंदणी यंत्रणा पुर्णपणे  ठप्प झाली आहे. त्यामुळे आधार नोंदणीत अपूर्ण असलेली जन्म तारीख पूर्ण करणे, चुकीचे व अपुर्ण नाव पूर्ण करणे, मराठी व इंग्रजी नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करणे, मोबाईल नंबर लिंक नसल्याने थम ठेवून पैसे काढणे, नवीन नाव नोंदणी करणे, बोटाचे ठसे अपडेट करणे, पाच व पंधरा वर्षावरील मुलांचे नाव अपडेट करणे आदी कामे ठप्प झाल्याने गरजूंची यावर अवलंबून इतर सर्व कामे ठप्प झाली आहेत. बँक खात्याशी आधार अपडेट नसल्याने काही ग्राहकांना खात्यावरील पैसे काढणे अडचणीचे ठरत आहे. काही शेतकर्‍यांना तर आधार अपडेट नसल्याने शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित रहावे लागले आहे. काहीजणांचे जनधन खात्यात रक्कमा जमा झाल्या आहेत. मात्र आधारकार्ड अपडेट नसल्याने पैसे काढणे मोठी अडचण झाली आहे. असे अनेक गरजू आधार नोंदणी कधी सुरु होईल? या प्रतिक्षेत आहेत. 

आधार नोंदणी केंद्र कधी सुरु होणार? अशी वारंवार विचारणा गरजूंमध्ये होताना दिसत असून तालुका प्रशासनाने आधार नोंदणी केंद्रास नियमांचे पालन करुन सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही केंद्र चालकांकडून होताना दिसत आहे. तसेच केंद्र चालकांकडूनही आधार नोंदणी सुरु करुन देण्याबाबतची मागणी संबंधित कार्यालयाकडे केली असून गरजूसह केंद्रचालकही आधार नोंदणीच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने याकडे लक्ष देवून आधार नोंदणी केंद्र सुरु करुन गरजूंची होणारी गैरसोय थांबवण्याची गरज आहे.

वाचा :'तीन महिन्यांचे घरगुती वीज बिल माफ करा'