Sun, Sep 20, 2020 09:32होमपेज › Kolhapur › परिक्षेत्रात डीजे वाजणार नाही

परिक्षेत्रात डीजे वाजणार नाही

Published On: Sep 23 2018 12:54AM | Last Updated: Sep 23 2018 12:27AMकोल्हापूर : प्रतिनिधी

उच्च न्यायालयाच्या बंदी आदेशामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत कोठेही डीजे वाजणार नाही, अशी ग्वाही विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. परिक्षेत्रांतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सकारात्मक आहेत. लोकप्रतिनिधी-पोलिस अधिकार्‍यांतील संवादामुळे सातारा जिल्ह्यात विसर्जन मिरवणुका शांततेत होतील, असेही ते म्हणाले.

छत्रपती उदयनराजे लोकप्रतिनिधी आहेत. लोकभावना व्यक्‍त करणे चुकीचे नाही. त्यांचा अधिकार आहे. याचा अर्थ प्रशासनाला आव्हान देत आहेत, असा होत नाही. सातारा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख हे खासदार उदयनराजे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधत आहेत. गतवर्षीही अशीच स्थिती निर्माण झाली होती. मात्र, लोकप्रतिनिधींसह सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी पोलिस यंत्रणेला सहकार्य केल्याचेही नांगरे-पाटील यांनी सांगितले.

कोल्हापूर परिक्षेत्रात फौजफाटा सज्ज

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात पोलिसांचा मोठा फौजफाटा सज्ज ठेवण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीणमधील संवेदनशील शहरांत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पाचही जिल्ह्यांतील स्थानिक पोलिस फौजफाट्याशिवाय पोलिस अधीक्षक 5-5, अप्पर पोलिस अधीक्षक 7-7, पोलिस उपअधीक्षक 35-35, पोलिस निरीक्षक 122-117, सहायक, उपनिरीक्षक 521, पोलिस 17 हजार 584, गृहरक्षक जवान 6 हजार 664, महिला 1500 याशिवाय राज्य राखीव दल, आरसीएफ, जलद कृती दलाच्या 12 कंपन्या दाखल झाल्या आहेत, असेही ते म्हणाले.

तणावमुक्‍त वातावरणात पोलिसांनी ड्युटी निभवावी

अधिकार्‍यांसह पोलिसांनी तणावमुक्‍त वातावरणात गणेश विसर्जन मिरवणुकीत ड्युटी निभवावी, असे आवाहन करून ते म्हणाले की, बंदोबस्त काळात पोलिसांच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यात येत आहे. समाजातील अनेक सामाजिक संस्था, दानशूर व्यक्‍ती पुढे येत आहेत. पोलिसही सर्वसामान्यांप्रमाणे नागरिक आहेत. तणावमुक्‍त वातावरणात पोलिस दलातील घटकांनी गणेश विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटावा, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत आदी उपस्थित होते.