Thu, Oct 01, 2020 23:38होमपेज › Kolhapur › राष्ट्रीय महामार्गामुळे कोल्हापुरात पूरस्थिती

राष्ट्रीय महामार्गामुळे कोल्हापुरात पूरस्थिती

Last Updated: May 23 2020 1:12AM
कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा
मागील वर्षीप्रमाणे पुराची स्थिती उद्भवू नये म्हणून कोल्हापूर आणि सांगलीचे जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्‍त, पाटबंधारे विभाग यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. पूर परिस्थीतीला बरेच घटक कारणीभूत आहेत. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग (एनएच 4 हायवे) हा उंची वाढवून भराव करून बांधलेला आहे. त्यामुळे हा हायवे बंधार्‍याचे काम करत आहे. या हायवे खालून पाणी पलीकडे जाण्यास जागा नाही. त्यामुळे पाण्याची फूग कोल्हापूर शहरात येते. शहरात पूरस्थिती निर्माण होते, असे स्थायी समिती सभेत नगरसेवकांनी सांगितले.

इचलकरंजीनजीक रुई येथील नवीन पुलाची उंची वाढवलेली आहे व रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे पाठीमागे फूग निर्माण होते. यासाठी त्या ठिकाणी पाणी पास करण्यासाठी मोठ्या पाईप टाकाव्यात. अलमट्टी धरणातील पाणी साठ्याबाबत समन्वय झाला आहे काय, अशी विचारणा नगरसेवकांनी केली. प्रशासनाच्या वतीने पाटबंधारे विभाग पाण्याच्या पातळीबाबत समन्वय साधत आहे, असे स्पष्ट केले गेले. स्थायी समिती सभापती संदीप कवाळे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभा झाली. विरोधी पक्षनेता विजय सूर्यवंशी, शारंगधर देशमुख, सत्यजित कदम, भूपाल शेटे, राजाराम गायकवाड, सचिन पाटील यांनी चर्चेत भाग घेतला.

पूरबाधित क्षेत्रातील फ्लॅटधारक,  हॉस्पिटल व बिल्डंरानी लाईफ जॅकेट, बोटी घेतल्या आहेत का? रेडझोन व ब्लू लाईन मधील कामे थांबली; पण अजूनही काही ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. पूर आलेल्या ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. परत त्यांना परवानगी दिली आहे का? अशा बिल्डरांवर कारवाई करा. पूर आलेल्या भागातील व नाल्याशेजारील सर्व बांधकामे तातडीने थांबवा. बाधित क्षेत्र नियमाप्रमाणे बोटी अथवा जॅकेट घेतली नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करा, अशी सूचना नगरसेवकांनी केली. सर्वांना पुन्हा नोटिसा काढू. क्रिडाईची बैठक घेऊ. 31 मे पर्यंत बोटिंग व लाईफ जॅकेट घेण्याची अंतिम तारीख आहे. ब्लू लाईनमध्ये बांधकामांना परवानगी दिलेली नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

 "