Mon, Aug 10, 2020 21:27होमपेज › Kolhapur › 'तीन महिन्यांचे घरगुती वीज बिल माफ करा'

'तीन महिन्यांचे घरगुती वीज बिल माफ करा'

Last Updated: Jul 13 2020 2:18PM

घरगुती वीज बील पूर्णपणे माफ करा, अशी मागणी करीत येथे तलाठी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वीज बिलांची होळी करण्यात आली.जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने राज्यात झालेल्या लॉकडाऊनच्या काळातील तीन महिन्यांचे घरगुती वीज बील पूर्णपणे माफ करा, अशी मागणी करीत येथे तलाठी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वीज बिलांची होळी करण्यात आली. जबरदस्तीने वसुली केल्यास अथवा थकीत वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडीत केल्यास परिस्थिती चिघळेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. शिरोळ तालुक्यातील सर्व गावांत स्वाभिमानीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. 

वाचा : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला; आणखी ८ जण पॉझिटिव्ह

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने राज्यात झालेल्या लॉकडाऊनच्या काळातील तीन महिन्यांच्या घरगुती वीज बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अव्वाच्या सव्वा दराने विजेची आकारणी झाल्याने सर्वसामान्यांची वीज बिले दुप्पट व तिप्पट आलेली आहेत. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी सुरू असून  रोजगार देखील बुडालेला आहे.

व्यापारपेठेतील मंदीमुळे कामगार वर्गांच्या हाताला काम नाही. उद्योगधंदे बंद पडले आहेत. यातच घरगुती वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. वीज वितरण कंपनीने घरगुती वीज बिलांमध्ये झालेली दरवाढ त्वरीत मागे घ्यावी. आर्थिक परिस्थिती ढासळल्याने वीज बिले भरणे शक्य नाही. त्यामुळे तीन महिन्यांचे वीज बील सरसकट माफ करण्यात यावे. थकीत वीज बिलांची रक्कम राज्य सरकारने महावितरणला अनुदान म्हणून द्यावी. तसेच कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही थकीत वीज बिलांची वसुली करू नये. जबरदस्तीने वसुली केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, कृपया याची नोंद घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी डॉ. श्रीवर्धन पाटील, डॉ. महावीर अक्कोळे, शैलेश आडके, शैलेश चौगुले, सागर मादनाईक, वासुदेव भोजण, शंकर नाळे, अभय भिलवडे, आशिष समगे, सतिश कोळेकर, अक्षय मासाळ, अमित मगदूम, शुभम चव्हाण, आकाश हातळगे, तेजस कुलकर्णी, अनिल कनवाडे, सुशांत कुंभार, वृषभ मादनाईक, सुनिल शेट्टी, प्रितम पाटील, बाहुबली आवटी, संजय मादनाईक, प्रेमजित पाटील, आदिनाथ मादनाईक आदी उपस्थित होते.

वाचा : 'कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन नाही'