कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
रयतेचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जुलमी सत्ताधार्यांशी ज्या तलवारींच्या सहाय्याने लढाया केल्या, त्यापैकी एक ‘जगदंबा’ तलवार इंग्लंड येथे राणीच्या वैयक्तिक संग्रहात आहे. ‘रॉयल कलेक्शन ट्रस्ट’मध्ये सेंट जेम्स पॅलेस येथे ती ठेवण्यात आली आहे. तमाम भारतीयांची अस्मिता असणारी ही तलवार परत आणावी, याकडे लक्ष वेधण्यासाठी इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्रात नियोजित सामने खेळू देणार नाही, असा इशारा शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाचे प्रमुख हर्षल सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
शिवछत्रतींची जगदंबा तलवार भारतात आणावी, यासाठीची चळवळ व्यापक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सभा-बैठका घेऊन राज्यव्यापी आंदोलन उभारले जात आहे. याचा पुढचा टप्पा म्हणून मार्च महिन्यात होणारे इंग्लंड टीमचे महाराष्ट्रातील क्रिकेट सामने रोखण्यात येणार आहेत. यासाठी प्रसंगी गनिमी कावा पद्धतीचे आंदोलन करू, असे सुर्वे यांनी सांगितले.
‘जगदंबा’ परत आण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न : सावंत
इसवी सन 1875-76 च्या सुमारास अवघ्या 11 वर्षांचे छत्रपती शिवाजी (चौथे) कोल्हापूच्या गादीवर राज्य करत असताना दिवाण माधव बर्वे याने इंग्लंडचा तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स (सातवा एडवर्ड) याच्या भेटीवेळी ही तलवार त्याला जबरदस्तीने भेट स्वरूपात देण्यास भाग पाडले होते. ही तलवार भारतात परत आणावी, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्यानंतर खासदार संभाजीराजे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबतची घोषणा केली होती. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस मोडी अभ्यासक अमित आडसुळे, चैतन्य अष्टेकर, विजय दरवान, प्रदीप हांडे, आप्पा रेवडे, शरद चौगुले आदी उपस्थित होते.