Thu, Oct 01, 2020 18:28होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात आणखी 18 रुग्ण आढळले

जिल्ह्यात आणखी 18 रुग्ण आढळले

Last Updated: Jul 07 2020 7:14AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे नवे 18 रुग्ण आढळून आले आहेत. इचलकरंजीत आणखी पाच रुग्णांची भर पडली आहे, तर आजरा तालुक्यातील पाचजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 984 वर गेली आहे. दिवसभरात तिघेजण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनातून पूर्ण बरे     झालेल्यांची संख्या 748 इतकी झाली.

रात्री आठ वाजता 141 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 119 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. दहा अहवाल प्रलंबित ठेवण्यात आले असून, एक अहवाल नाकारण्यात आला आहे. 

इचलकरंजीत कोरोनाची संख्या वाढतच चालली आहे. आज दिवसभरात त्यात नव्या तीन रुग्णांची भर पडली. यामुळे इचलकरंजीतील बाधितांची संख्या 73 वर गेली आहे. कलानगरात 20 वर्षीय तरुणासह 11 वर्षीय बालिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मनगुळे मळा, आभार फाटा येथे 35 वर्षीय पुरुषालाही कोरोनाची लागण झाली आहे.

आजरा तालुक्यातील भादवण येथील आणखी 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे भादवण गावात बाधितांची संख्या 12 वर गेली आहे. आज दिवसभरात 85 वर्षांच्या वृद्धासह 26 व 21 वर्षीय तरुण तसेच 23 आणि 25 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

गडहिंग्लज तालुक्यात आज आणखी दोन रुग्णांची भर पडली. हेब्बाळ येथील 25 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हारुरच्या बाधित रुग्णाच्या संपर्कात ही महिला आली आहे. कर्नाटकातील एका बाधिताच्या संपर्कात आल्याने कुमरी येथील 23 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. भुदरगड तालुक्यातील मुदाळ तिट्टा येथील एका 35 वर्षीय पुरुषाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

रात्री आणखी तीन अहवाल प्राप्त झाले. हे तिन्ही पॉझिटिव्ह अहवाल चंदगड तालुक्यातील रुग्णांचे आहेत.  या तीन बाधित रुग्णांमुळे चंदगडमध्ये एकूण बाधितांची संख्या 114 वर गेली आहे. दिवसभरात तिघेजण कोरोनामुक्त झाले. त्यांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले. यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 748 इतकी झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयात 219 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 "