Wed, Oct 28, 2020 10:38होमपेज › Kolhapur › मंत्रिमंडळ घरातून बांधावर!

मंत्रिमंडळ घरातून बांधावर!

Last Updated: Oct 19 2020 12:33AM
कोल्हापूर : पुढारी डेस्क 

कोरोनामुळे सुरुवातीच्या काळात कार्यालयातून व नंतर घरातून कारभार पाहणार्‍या मंत्र्यांना अतिवृष्टीने बांधावर आणले आहे. मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते सोमवारी बांधावर पोहोचत आहेत. काही मंत्री, अन्य पक्षांचे नेते पोहोचले आहेत. याबरोबरच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याने कोरोना काळात शांत झालेल्या राजकारणालाही उकळी फुटत आहे. 

आता ‘हिसाब बराबर’ या न्यायाने नेते एकमेकांवर तोफ डागत आहेत. उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाच्या संतापाला काही ठिकाणी या नेत्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘मातोश्री’बाहेर पडत नसल्याची टीका त्यांच्यावर होत होती. कोरोना काळात ठाकरे एकदा पुणे दौर्‍यावर आले होते. मात्र, आता अतिवृष्टीने महाराष्ट्रात जो हाहाकार उडाला आहे व बळीराजा उद्ध्वस्त झाला आहे त्याची दखल घेण्यासाठी ते सोमवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही मराठवाडा दौर्‍यावर आहेत. ते औरंगाबाद येथे झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत. त्यांनी खासदारांना बरोबर घेऊन पंतप्रधानांना भेटणार असल्याचे सांगितले. 

विधानसभेतील विरोधी पक्षनेते सोमवारपासून तीन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. सोमवारी मुख्यमंत्री ठाकरे व विरोधी पक्षनेते फडणवीस दोघेही सोलापूर दौर्‍यावर जाणार आहेत. त्यांच्यात मदतीवरून शब्दयुद्ध रंगण्याची चिन्हे आहेत. त्याची झलक सांगलीत दिसली आहे. राज्याचे लक्ष केंद्राच्या मदतीकडे आहे. सगळी जबाबदारी केंद्राची, तर मग राज्य सरकार काय करणार? असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला खिंडीत पकडले 
आहे.

आता फडणवीस काय भूमिका मांडणार, ते सोलापूरच्या दौर्‍यात स्पष्ट होईल. फडणवीस हे तीन दिवसांच्या काळात सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, लातूर, बीड, हिंगोली, जालना व औरंगाबादचा दौरा करणार आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येणार आहेत. 

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख हे उस्मानाबादचे पालकमंत्री आहेत. त्यांनी येणेदूर गावाला भेट देऊन पाहणी केली. कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. तर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी व सिंधुदुर्ग दौर्‍यावर आहेत. तेथे नुकसान झाले आहे; पण जोरदार लाटांमुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे या प्रश्‍नालाही सरकारला तोंड द्यावे लागणार आहे. त्याशिवाय पालकमंत्रीही आपापल्या जिल्ह्यांत नुकसानीच्या आकडेवारीकडे लक्ष देऊन आहेत. सगळ्यांचे लक्ष आता पंचनाम्यांकडे लागले आहे. सगळे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा आकडा हाती येणार आहे. 

संतप्‍त शेतकर्‍यांनी वडेट्टीवार यांना अडवले

मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार हे नांदेड जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. तेथे त्यांना शेतकर्‍यांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. त्यांचा मोटारींचा ताफा अडवून पाहणी दौरे बंद करून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी संतप्‍त शेतकर्‍यांनी केली. मुखेड तालुक्यातील सलगरा येथे हा प्रकार घडला. 

 "