Wed, May 19, 2021 05:06
गोकुळ निवडणुकीसाठी थांबला होता कोरोना.. आता कडक लॉकडाऊन सुरू!

Last Updated: May 05 2021 2:16AM

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापुरात कोरोना फक्त गोकुळ निवडणुकीसाठी किणी टोल नाक्यावर थांबला होता. बुधवारपासून  (दि.5) तो पुन्हा सक्रिय होणार.. त्यांचं काम झालं.. आता तुमचं काम बंद..पीपीई कीट घालून मतदान..मग पीपीई कीट घालून व्यवसाय का नाही? अशा खुमासदार शैलीतील उपाहासात्मक टीका, निषेधाच्या पोस्ट व्हायरल करीत जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली गेली. राजकीय नेत्यांवर टीकेची झोड उठवत नेटकर्‍यांनी जाहीर निषेध करीत संताप व्यक्त केला.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर  महिनाभरापासून महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ निवडणुकीचा मंगळवारी निकाल जाहीर झाला. अन् तत्काळ कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या बैठकीत जिल्ह्यात  कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनची माहिती वार्‍यासारखी जिल्हाभर पसरली. यावर सोशल मीडियावर लॉकडाऊनसंदर्भात क्षणार्धात प्रतिक्रिया उमटल्या. 

सामान्य कोल्हापूरच्या पोस्टने वेधले लक्ष!

कोरोना प्रकोपात राजकीय नेते, कार्यकर्ते गोकुळ निवडणुकीत मग्न होते. या काळात रेमडेसिवीर इंजेक्शन, लसीची उपलब्धता, ऑक्सिजन बेडची सोय याचा कुणीही विचार केला नाही. गोकुळची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होत आल्यानंतर तत्काळ कडकडीत लॉकडाऊन जाहीर केला. या प्रकारास काय म्हणायचे? जनतेला गृहीत धरून मनमानी पद्धतीने निर्णय घेतला. आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून रोजीरोटी मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. ते पण तुम्ही लॉकडाऊन करून मोडून पाडत आहात, अशी सामान्य कोल्हापूर नावाने सोशल  मीडियावर व्हायरल पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.

सोशल मीडियावरील काही निवडक व्हायरल पोस्ट...

  काल गोकुळात रंग खेळले हरी.. नागरिका आता जपून राहा तुझ्या घरी.. 

  जिल्ह्यात दहा दिवस कडक लॉकडाऊन.. गोकुळ लयच मोठं आहे की राव..! आयपीएल पण रद्द केली गोकुळ इलेक्शन झाल्यावर... 

  मनपाची निवडणूक जाहीर केल्यास कोरोना जाऊ शकतो. बघायला काही हरकत नाही..

  गोकुळचा निकाल लागताच कोल्हापुरात कडक लॉकडाऊन.. नेत्यांनी गरज भागवून घेतली. जनतेच्या गरजांचे काय? 
- सामान्य नागरिक

गोकुळ निवडणुकीत झालेली धावपळ लक्षात घेता बुधवारपासून थोड्या विश्रांतीसाठी कडक लॉकडाऊन जाहीर करीत आहोत. सामान्य जनतेने सर्व व्यवहार बंद ठेवून आम्हाला विश्रांती घेऊ द्यावी. 
- आपलेच नेते.

बुधवारपासून बाहेर पडल्यावर पोलिसांनी अडविल्यास अभिमानाने सांगायचे.. गोकुळचे दूध आणायला निघालोय.. अत्यावश्यक सेवा.. मतलबी राजकारणी जाहीर निषेध...

जिल्ह्यातील कोरोना निवडणुकीसाठी थांबला होता. आता तो बुधवारपासून सक्रिय होईल. याचा विरोध झाला पाहिजे. व्यापार्‍यांनी लॉकडाऊनचा विरोध रस्त्यावर उतरून केला पाहिजे.