Fri, Oct 02, 2020 01:52होमपेज › Kolhapur › टिक टॉकवर बहिष्कारास कोरोनाचीही किनार

टिक टॉकवर बहिष्कारास कोरोनाचीही किनार

Last Updated: May 22 2020 11:09PM
कोल्हापूर : पुढारी डेस्क

फैझल सिद्दिकी याच्या ‘अ‍ॅसिड अ‍ॅटॅक’चा व्हिडीहो व्हायरल झाल्यानंतर टिक टॉकवर बंदीची मागणी देशात सुरू झाली आहे. टिक टॉकवर बंदी येईल की नाही, माहिती नाही; पण एकुणातील या वादात गुगल प्ले स्टोअरवरील टिक टॉकच्या रेटिंगवर कमालीचा विपरित परिणाम झाला आहे. टिक टॉकची रेटिंग 4.7 वरून आता 2.0 पेक्षाही खाली गेलेली आहे. छोटेखानी व्हिडीओ बनविण्याचे टिक टॉक हे अ‍ॅप कमालीचे लोकप्रिय होते. आभासी जगात कोण श्रेष्ठ त्यावरून टिक टॉक आणि यू ट्यूबमध्ये सुरू असलेल्या संघर्षात टिक टॉकच्या रेटिंग घसरणीची बीजे दडलेली आहेत. दोघांच्या या भांडणात नेटकरीही नेटाने टिक टॉकच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

ठिणगी पडली तेव्हापासून गुगल प्ले स्टोअरवर टिक टॉक अ‍ॅपला नेटकरी एकापाठोपाठ एकच स्टार ठोकत आहेत. म्हणजेच रेटिंगमध्ये सर्वांत किमान गुण देत आहेत.  टिक टॉक अ‍ॅपवर बंदी घालावी, अशी मागणी करणारे नेटकरीही संख्येने मोठेच आहेत. अर्थात, भारतामध्ये टिक टॉकची काय क्रेझ आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. टिक टॉक व्हिडीओ बनविणारे थोडे थोडके असले, तरी वापरणारे ढिगाने आहेत. देशातील 61 कोटींहून अधिक लोकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप आवर्जून डाऊनलोडेड आहे. जगभरातील मोबाईलमध्ये डाऊनलोड झालेल्या टिक टॉक अ‍ॅपच्या तुलनेत भारतातील हे प्रमाण सुमारे 30 टक्के आहे.

अ‍ॅसिड हल्ल्याच्या उदात्तीकरणाचा व्हिडीओ, सिद्दिकीच्या विरोधात एकवटलेला नेटकर्‍यांचा संताप ही सगळी कारणे निमित्तमात्र आहेत. टिक टॉक हे चिनी अ‍ॅप आहे आणि कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर चीन आणि चिनी उत्पादनांवर बहिष्काराची भारतात बळावत चाललेली भावनाही घसरलेल्या या रेटिंगमागे आहे, असे मानणारा एक मोठा वर्ग आहे. कोल्हापुरातील एका तरुण सोशल मीडिया युझरने दै. ‘पुढारी’शी बोलताना एका वाक्यात सगळे सांगून टाकले. तो म्हणाला ‘चिन्यांचे आपल्याला काही नको. मी चहाही आता चिनी मातीच्या कपबशीत पीत नाही तर...’ 

असे एकवटले नेटकरी अन् असे कोसळले रेटिंग

 यू ट्यूब आणि टिक टॉकमधील वादानंतर 2 कोटी 40 लाख नेटकर्‍यांनी टिक टॉकवर बहिष्काराचे शस्त्र उगारले आहे. बहुतांश नेटकर्‍यांनी 1 स्टार रेटिंग दिली आहे. दुसरीकडे 7 लाख 22 हजार नेटकर्‍यांकडून टिक टॉक लाईट व्हर्जनला 1.1 रेटिंग मिळाली आहे. यू ट्यूबला मात्र नेटकर्‍यांकडून 4.1 रेटिंग देण्यात आली आहे. गुगल प्ले स्टोअरवर टिक टॉकची रेटिंग शुक्रवारी 1.2 होती, तर अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर या अ‍ॅपची रेटिंग 4 आहे. ट्विटरवर सध्या ‘बॅन टिक टॉक’ ट्रेन्ड सुरू आहे. टिक टॉक सेलिब्रिटी फैझल सिद्दिकी हा त्याचे मुख्य कारण आहे. 

महिला आयोग, पोलिसांपर्यंत प्रकरण

सिद्दिकीने अ‍ॅसिड हल्ल्याचे उदात्तीकरण करणारा एक व्हिडीओ टिक टॉकवर टाकला आणि या प्रकरणाला सुरुवात झाली. व्हिडीओत फैझल त्याच्या आभासी प्रेमिकेला म्हणतो, ‘क्या इस आदमी के लिए तुमने मुझे छोड़ दिया था?’ आणि नंतर तो आभासी प्रेमिकेच्या चेहर्‍यावर अ‍ॅसिड फेकतो. प्रेयसीच्या जळालेल्या चेहर्‍यानिशी हा व्हिडीओ संपतो. या व्हिडीओबद्दल सर्वत्र धिक्‍काराचा सूर होताच. राष्ट्रीय महिला आयोगाने जेव्हा या व्हिडीओला हरकत घेतली, तेव्हा स्वत: टिक टॉककडून सिद्दिकीचे टिक टॉक अकाऊंट सस्पेन्ड करण्यात आले. महिला आयोगाने टिक टॉक इंडिया आणि महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशा सूचना केल्या.

लॉकडाऊनमध्ये लोक ’महाभारत’ आणि’रामायण’ पाहून दूरदर्शनचा टीआरपी वाढवत आहेत, तर दुसरीकडे देशभरातील तरुणाईत सोशल मीडियावर एक वेगळेच महाभारत सुरू झाले आहे. सोशल मीडियावरील महाभारताच्या युद्धाचा बिगूल यू ट्यूबवरून वाजला. टिक टॉकला झटका देऊन या युद्धाचे वारे इन्स्टाग्रामपर्यंत जाऊन धडकले. नंतर हे वारे यू ट्यूबवर परतले आणि आता दस्तुरखुद्द यू ट्यूबला या युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी पांढरे निशाण दाखवावे लागले. एक पाऊल पुढे टाकावे लागले. 

ही कथा सुरस आहे. कथामालिकेला  यूू ट्यूबर एल्विश यादव याच्या एका रोस्टिंग (टवाळी करणार्‍या) व्हिडीओतून सुरुवात झाली. एल्विशने टिक टॉकच्या युझर्सची खिल्ली उडवणे सुरू केले. ज्यांची शिकार या व्हिडीओने केली, ते टिक टॉकचे योद्द्ये आमिर सिद्दिकी याच्या नेतृत्वाखाली एकवटले. आमिरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एल्विशवर प्रहार केला आणि यू ट्यूबर्स कसे खालच्या दर्जाचे आहेत, हे आपल्या व्हिडीओतून अधोरेखित केले. मग, पुढे आक्रमण-प्रत्याक्रमणाला पेवच फुटले.

एल्विशनंतर ट्रिगर्ड इन्सान आणि लक्ष्य चौधरीसारखे यू ट्यूबरही एल्विशच्या मदतीला धावून आले. दुसरीकडून टिक टॉकवालेही यू ट्यूबर्सविरोधात आग पेटवत राहिले. कॅरी मिनाटी (खरे नाव अजय नागर) जेव्हा मैदानात उतरला तेव्हा आगीचे लोळच लोळ उठले. कॅरीने आपल्या 12 मिनिटांच्या व्हिडीओतून आमिर सिद्दिकीला अक्षरश: लोळविले. कॅरीचा हा व्हिडीओ 6 दिवसांत 7 कोटी लोकांनी बघितला.

पण, अखेरीस हे सगळे यू ट्यूबलाच नकोसे झाले आणि यू ट्यूबने कॅॅरी मिनाटीचा व्हिडीओ डीलीट केला. लाखो यू ट्यूबर्स यू ट्यूबकडे तो व्हिडीओ परत पोस्ट करा म्हणून आग्रह धरत आहेत. या व्हिडीओपूर्वी कॅरीच्या यू ट्यूब रोस्टिंग चॅनेलला 10 कोटी सब्स्क्राईबर होते, तर यानंतर त्याच्या चॅनेलला चक्‍क 7 कोटी नवे सब्स्क्राईबर्स मिळाले आहेत. राहता राहिला सिद्दिकीचा विषय, तर टिम नबाब म्हणून टिक टॉकवर त्याचे 3 कोटी फॉलोअर्स आहेत. कॅरीचा व्हिडीओ यू ट्यूबने हटविलेला असला, तर या प्रकरणावर अजून पडदा पडलेला नाही. ते पेटलेलेच आहे.... धुमसतेच आहे.
 

 "