Wed, Aug 05, 2020 19:38होमपेज › Kolhapur › 1.20 लाखाची लाच घेताना लिपिक जाळ्यात

1.20 लाखाची लाच घेताना लिपिक जाळ्यात

Last Updated: Jul 07 2020 7:14AM

लिपिक सागर आनंदराव शिगावकरकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

हमीदवाडा (ता. कागल) येथील विक्री केलेल्या जमिनीचा व्यवहार तुकडेबंदी तुकडेतोड कायद्याप्रमाणे नियमित करून देण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांची लाच घेणार्‍या कागल-राधानगरी उपविभागातील लिपिक सागर आनंदराव शिगावकर (वय 36, रा. रविवार पेठ) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले. कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयात सापळा रचून लिपिकाला अटक करण्यात आल्याने महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

कागल-राधानगरी उपविभागीय कार्यालयात सतत चर्चेत राहिलेल्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जेरबंद केल्याची माहिती परिसरात वार्‍यासारखी पसरताच कार्यालयात क्षणार्धात सन्नाटा निर्माण झाला. पथकाने सायंकाळी  शिगावकर याच्या रविवार पेठेतील उमा टॉकिजजवळील घराची तपासणी केली. संशयिताविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले की, तक्रारदार व्यक्तीने 2011 मध्ये हमीदवाडा (ता. कागल) येथील गट नंबर 216 मधील 20 गुंठे जमीन आई व बहिणीच्या नावे खरेदी केली होती. या जमिनीपैकी साडेनऊ गुंठे जमीन 2015-16 मध्ये त्यांनी चौघांना विक्री केली. त्यापैकी 9 गुंठे जमीन घेणार्‍यांच्या नावे 7/12 पत्रकी नोंद झाली. मात्र, उर्वरित अर्धा गुंठा जमिनीचा अर्थबोध होत नव्हता. त्यामुळे अर्धा गुंठा जमिनीवर खरेदीदार कुंभार दाम्पत्याच्या नावाची नोंद 7/12 पत्रकी झाली नव्हती.

तक्रारदार व कुंभार यांनी हमीदवाडा येथील तलाठी नितीन पाटील यांच्याशी संपर्क साधला. पाटील यांनी त्यांना कामाच्या अनुषंगाने रीतसर अर्ज देण्याची सूचना केली. त्यानुसार या जमिनीच्या 7/12 पत्रकी फेरनोंद घालण्यासाठी अर्ज देण्यात आला. मात्र, तलाठी पाटील  यांनी अर्जावर पोहोच न देता कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील कागल-राधानगरी प्रांत कार्यालयात जाऊन तुकडेबंदी तुकडेतोड कायद्याप्रमाणे जमिनीच्या मूल्यांकनाच्या 25 टक्के शासकीय दंड भरून हा खरेदी-विक्री व्यवहार नियमानुकूल करून घ्यावा, असे सांगितले.

तलाठ्याच्या सूचनेनुसार तक्रारदार व कुंभार दाम्पत्याने डिसेंबर 2019 मध्ये अर्ज दाखल केला. त्यानंतर प्रांत कार्यालयातील लिपिक सागर शिगावकर याची भेट घेऊन चर्चा केली. विक्री केलेल्या जमिनीचा व्यवहार नियमित करून देण्यासाठी शिगावकर याने 1 लाख 20 हजार रुपयांची मागणी केली. मला जर पैसे दिले नाहीत, तर कागदपत्रे अपूर्ण आहेत, असे कारण सांगून अर्ज निकालात काढून टाकेन, असेही त्याने सुनावले. या घटनेनंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक बुधवंत, पोलिस निरीक्षक जितेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.

स्वच्छतागृहात रक्कम मोजली; पण दुसर्‍या क्षणी जाळ्यात!

पथकातील अधिकार्‍यांनी येथील प्रांताधिकार्‍यांच्या कार्यालयात दुपारी सापळा रचला. शिगावकरने तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारताच कार्यालयातील स्वच्छतागृह गाठले. दरवाजा बंद करून रक्कम मोजून खिशात ठेवली. स्वच्छतागृहातून बाहेर येताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. ‘एसीबी’च्या जाळ्यात सापडल्याचे लक्षात येताच संशयिताला घाम फुटला. संशयिताला ताब्यात घेऊन पोलिस बंदोबस्तात त्यास ‘एसीबी’च्या कार्यालयात आणण्यात आले. मंगळवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

7 महिन्यांत 15 जणांवर कारवाई

जानेवारी ते जुलै 2020 या काळात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने लाच स्वीकारणार्‍या 15 जणांना रंगेहाथ पकडले आहे. त्यात एका वरिष्ठ अधिकार्‍याचाही समावेश आहे. लाच अथवा अपसंपदेबाबत तक्रारी असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही बुधवंत यांनी केले आहे.