Wed, Oct 28, 2020 10:11होमपेज › Kolhapur › कोरोनाग्रस्त मातांचे बाळंतपण सीपीआरमध्ये सुखरूप

कोरोनाग्रस्त मातांचे बाळंतपण सीपीआरमध्ये सुखरूप

Last Updated: Aug 04 2020 11:23PM
कोल्हापूर ः एकनाथ नाईक  

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. गरोदर मातांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. अशातच सीपीआरच्या प्रसूती विभागात 110 कोरोना संशयितांसह बाधितांवर उपचार झाले. त्यामध्ये 35 कोरोनाग्रस्त मातांचं बाळंतपण या रुग्णालयाने अगदी सुखरूप केले आहे. बाळासह बाळंतिणींनी कोरोनावर मात केल्याची माहिती सीपीआर प्रशासनाने दिली. 

सीपीआरचा प्रसूती विभाग जिल्ह्यातील गरोदर मातांसाठी आधारवड आहे. पण कोरोनाचा प्रकोप वाढल्यानंतर हे रुग्णालय कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवले. कोरोनाची लागण झालेल्या गरोदर मातांसाठी येथे विशेष वॉर्ड ठेवला आहे. कोरोनाबाधित गरोदर महिलांवर खासगी रुग्णालयात उपचाराचे सहसा धाडस केले जात नाही. अशा रुग्णांना सीपीआरशिवाय पर्याय नाही. कोरोना संकटात सीपीआर रुग्णालय ढाल बनून रुग्णसेवेत आहे. गरोदर मातांसाठी हे रुग्णालय यापूर्वीही मोठा आधारच होते. कोरोना संकटातही आहे. 

सीपीआरमध्ये कोरोनाबाधित 35 मातांची प्रसूती सुखरूप झाली ही तर आनंदाची बाब आहे. मात्र या मातांना कोरोना संसर्ग कशामुळे व  कोठे झाला, हे अजून समजू शकलेले नाही. 35 पैकी 30 मातांची नैसर्गिक प्रसूती झाली तर 5 मातांचे सिझेरियन झाले आहे. प्रसूतीसाठी आलेल्या मातांना कोरोना तपासणीनंंतरच पुढील उपचारासाठी दाखल करून घेतले जाते.

लक्षणे नसता कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने माता गर्भगळीत होतात. मात्र येथील वैद्यकीय पथक समुपदेशन करून त्यांना कोरोनाच्या धास्तीपासून परावृत्त करतात. सीपीआरच्या प्रसूती विभागात कोरोनाबाधित मातांची प्रसूतीसाठी शिफ्टप्रमाणे डॉक्टरांच्या ड्युटी लावलेल्या असतात. सुमारे 7 डॉक्टर, 6 परिचारिका आणि इतर 7 कर्मचारी रुग्णसेवेत असतात.

सीपीआरच्या प्रसूती विभागाचे काम चांगले आहे. कोरोना संकटात येथील वैद्यकीय पथक येणार्‍या गरोदर महिलांची त्वरित कोरोना तपासणी करून त्यांना वेळेवर उपचार देतात. शिवाय सुखरूप प्रसूतीवर त्यांनी अधिक भर दिला आहे. त्यामुळे आईसह बाळांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. 
- डॉ. चंद्रकांत म्हस्के, अधिष्ठाता, सीपीआर 

 "