Wed, Oct 28, 2020 11:45होमपेज › Kolhapur › अयोध्येतील राममंदिर अन् कोल्हापूरकरांची कारसेवा

अयोध्येतील राममंदिर अन् कोल्हापूरकरांची कारसेवा

Last Updated: Aug 05 2020 1:25AM
कोल्हापूर : सागर यादव 

‘रामलल्‍ला का ध्यान धरो, मंदिर का निर्माण करो..., श्रीराम जय राम जय जय राम...’, असा निर्धार करून अयोध्येतील राममंदिरासाठीच्या कारसेवेत कोल्हापुरातील रामभक्‍त उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. सन 1988 पासूनच्या कारसेवेत कोल्हापूर जिल्ह्यातील कारसेवकांनी आपली सेवा बजावली होती. 5 ऑगस्ट 2020 या दिवशी  राम मंदिराची पायाभरणी होत आहे. यानिमित्ताने कोल्हापूरकरांच्या कारसेवा आणि राम जन्मभूमी व मंदिर उभारणी संदर्भातील आठवणींना उजाळा मिळाला.

अयोध्या येथील राम मंदिराच्या कार सेवेत विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू एकता, हिंदू जनजागरण समिती, शिवराष्ट्र धर्म संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, दुर्गा वाहिनी या संघटनांसह शिवसेना-भारतीय जनता पक्ष आदी पक्षांच्या कोल्हापूर व इचलकरंजी विभागातील सुमारे पाच हजार स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला होता. प्रफुल्‍ल जोशी, सुभाष वोरा, माधवराव साळुंखे, अण्णा ठाकूर, दिलीप भिवटे, हेमंत पाटील, सुबोध बापट, प्रदीप गोसावी, केशव स्वामी, ज. गो. कुलकर्णी, दीपक मगदूम, अशोक देसाई, प्रकाश कुलकर्णी, आर. एस. कुलकर्णी, शंकराचार्य विद्या नृसिंह भारती, विलास दाभोळकर, जवाहर छाबडा, सुहास कुलकर्णी, प्रकाश पोटे, प्रभाकर गणपुले, शिवाजी बुवा, संभाजी पाटील, सतीश पाटील, जयवंतराव माने यांच्यासह अनेक ज्ञात-अज्ञात कारसेवकांनी विविध स्तरांत सेवा बजावली होती. 

अयोध्येतील राम मंदिराचा पायाभरणीचा सोहळा म्हणजे  गेल्या तीन दशकांहून अधिक काळ राम मंदिर उभारणीसाठी राम भक्‍तांनी केलेल्या कारसेवेचे फळ आहे. राम मंदिर भविष्यात केवळ  भारताचेच नव्हे; तर संपूर्ण विश्‍वाचा मानबिंदू ठरेल, असा विश्‍वास श्री स्वामी जगद‍्गुरू शंकराचार्य पीठ करवीरचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी व्यक्‍त केला. राम मंदिर भूमिपूजन समारंभाच्या पूर्वसंध्येला त्यांनी हा संदेश दिला. 

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सुरू असणार्‍या न्यायालयीन वादानंतर राममंदिराची उत्सुकता तमाम भारतीयांना लागली होती.  प्रभू श्रीरामचंद्र हे विश्‍ववंदनीय आहेत. सर्वांना न्याय हे त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण कार्य होते. यामुळे मानवाने आपल्या जीवनात प्रभू श्रीराम यांचा आदर्श प्रत्येक क्षणी ठेवणे अत्यावश्यक आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने लोकांनी रामभक्‍तीच्या मार्गावरील मार्गक्रमणास सुरुवात करावी, असे आवाहनही विद्यानृसिंह भारती यांनी केले. 

कारसेवक म्हणून माझा खारीचा वाटा

सन 2001 ते 2002 मध्ये एफ.वाय. बी. कॉम.मध्ये शिक्षण घेत होतो. सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी राम मंदिराचा शिलान्यास करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी उत्तर प्रदेश सरकारने या कार्यक्रमावर बंदी घातली होती. तरीही शिलान्यास करण्याचा आमचा निर्धार कायम होता. कोल्हापुरातून आम्ही जवळपास 450 ते 500 राम भक्‍तांनी अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला.  लखनौच्या अलीकडील 25 कि.मी. अंतरावर हरोनी नावाच्या स्टेशनवर पोलिसांनी आमची गाडी थांबवली. आम्हा सर्व राम भक्‍तांना गाडीतून उतरविण्यात आले. आमच्यासह सुमारे 3 हजार राम भक्‍तांना जेलमध्ये ठेवण्यात आले. कारागृहातील आठ दिवसांनंतर शिलान्यासाचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्हा सर्व राम भक्‍तांना हातावर सरकारी शिक्के मारून सोडून देण्यात आले. रात्री आम्ही अयोध्याला जाण्यासाठी लखनौ रेल्वे स्टेशनवर गोळा झालो. रात्री दोन वाजता प्रचंड गर्दीत राम नामाचा जयघोष करत अयोध्या गाठली. तेथे शरयू नदीत स्नान करून रामाच्या प्रतिमेचे दर्शन घेतले व परतीचा मार्ग धरला, अशी आठवण कोल्हापूरच्या मनीषानगर येथे राहणारे मानसिंग पाटील यांनी सांगितली. 

शिवाजी बुवा यांची सहकुटुंब कारसेवा 

1986 च्या अयोध्यासंदर्भातील निकालानंतर श्रीराम मंदिराचे कुलूप काढण्यात आले. खर्‍या अर्थाने येथूनच श्री राम मंदिर निर्माणाचे आंदोलन विश्‍व हिंदू परिषदेने सुरू केले. यात शिये (ता. करवीर) येथील शिवाजी बुवा यांनी सक्रिय सहभाग घेतला. प्रतिकूल परिस्थितीत गावोगावी जनजागरण मोहीम राबवून केवळ सव्वा रुपया लोकवर्गणी व एक वीट याप्रमाणे शिये येथे  विटा गोळा केल्या. एकत्रित केलेल्या विटा अयोध्येला पाठवण्यासाठी कै. वेदशास्त्रसंपन्‍न जेरे शास्त्री यांच्या हस्ते विधिवत पूजा करून त्या विटा अयोध्येला पाठवल्या.

सन 1990 ला अयोध्येला कारसेवेसाठी 150 लोक गेले होते. शिये येथील शिवाजी बुवा यांनी सहकुटुंब कारसेवा बजावली होती. शिवाजी बुवा यांच्यासह त्यांच्या पत्नी सुवर्णा बुवा, बंधू विलास बुवा, वहिनी सुनीता बुवा, जयसिंगपूरचे बळवंत चौगले व सौ. शारदा चौगले यांचा समावेश होता. पोलिसांनी रेल्वे अडवून कारसेवकांना ताब्यात घेतले. पण ही तीन जोडपी व एक सहकारी अशा सात जणांनी आम्ही तीर्थयात्रेला चाललो आहोत म्हणून खोटे सांगितल्याने रेल्वेतून त्यांना पुढचा प्रवास करता आला.

यानंतर पुढे भीतीदायक, गंभीर परिस्थितीमुळे सात जणांनी मध्येच रेल्वेतून उतरून आडमार्गाने पायपिटीच्या चित्तथरारक प्रसंगांची माहिती शिवाजी बुवा यांनी दिली.  1992 च्या कारसेवेत शिवाजी बुवा आपल्या सहा महिन्यांच्या शरयू नावाच्या मुलीला आईकडे ठेवून सपत्नीक सहभागी झाले. त्यावेळी अयोध्येत झालेल्या तात्पुरत्या बांधकामासाठी आपणास सपत्नीक सिमेंट-वाळू कालवून देण्याचे पुण्यकर्म करता आल्याची आठवण बुवा यांनी सांगितली. 

 "