Wed, Oct 28, 2020 11:49होमपेज › Kolhapur › अंबाबाईची पालखी प्रदक्षिणा उत्साहात

अंबाबाईची पालखी प्रदक्षिणा उत्साहात

Last Updated: Oct 19 2020 12:45AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या नवरात्रौत्सवाच्या दुसर्‍या दिवशी रविवारी पारंपरिक पद्धतीने पालखी प्रदक्षिणा सोहळा झाला. कोरोनामुळे सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून मोजक्या सेवेकर्‍यांची उपस्थिती होती.  नवरात्रौत्सवाच्या दुसर्‍या दिवशी 5 लाख 50 हजार भाविकांनी देवीचे ऑनलाईन दर्शन घेतले. 

रविवारी प्रथेप्रमाणे पहाटेपासूनच धार्मिक विधी झाले. दुपारी देवीची पूजा बांधण्यात आली. रात्री पारंपरिक वाद्ये व लवाजम्यासह उत्सवमूर्तीची पालखी प्रदक्षिणा झाली. ‘मेना’च्या आकारातील पालखी सजविण्यात आली होती. पालखी सजावट सुरेश जरग, प्रवीण जरग यांनी केली.  लखन गवळी, अभिजित भोई, विनोद येटाळे, विश्‍वास पाटील यांनी सहकार्य केले. 

दोन दिवसांत 10 लाख भाविकांचे ऑनलाईन दर्शन   

कोरोनामुळे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली आहे. या अंतर्गत  पहिल्याच दिवशी 4 लाख 99 हजार 892 भाविकांनी, तर दुसर्‍या दिवशी  5 लाख 50 हजार भाविकांनी ऑनलाईन दर्शन घेतल्याची (वेबसाईट व्हिजिटर्स) नोंद देवस्थानकडे झाली.

त्र्यंबोली-अंबाबाई देवीची भेट बुधवारी

यंदा ललित पंचमी मंगळवारी (दि. 20), तर त्र्यंबोली यात्रा बुधवारी (दि.21)   आहे. यामुळे करवीरनिवासिनी अंबाबाई व त्र्यंबोलीदेवी यांच्या भेटीचा सोहळा त्र्यंबोली यात्रेदिवशी म्हणजेच बुधवारी दुपारी 12 वाजता होईल. मोजक्या सेवेकरी व मानकर्‍यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. 


 

 "