Mon, Jan 18, 2021 19:51
तपास चक्र- मुलाला चॉकलेट देऊन लावला खुनाचा तपास, जालना पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांचे तपासात कौशल्य

Last Updated: Jan 05 2021 4:51PM

मयत अंकुश राठोडजालना : सुहास कुलकर्णी

बीड जिल्ह्यातील केसापुरी तांडा येथील ऊस मुकादम अंकुश भाऊराव राठोड यांच्या खुनाचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी विविध पर्यायांचा वापर केला. तपासात लहान मुलाला कॅडबरी चॉकलेट दिल्यानंतर त्याने मयत अंकुश राठोड यास रात्री कोकाटे हादगाव येथे पाहिल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांना तपासाची दिशा मिळाली. (jalna police using various options during investigation and revealed murder mystery of Ankush Rathod)

वाचा : तपास चक्र - अनैतिक संबधात अडसर ठरलेल्या मुलाला आईनं प्रियकराच्या मदतीनं संपवलं; पण सारवलेल्या अंगणाने फोडली गुन्ह्याला वाचा...

बीड जिल्ह्यातील केसापुरी तांडा येथील ऊसतोड मुकादम अंकुश राठोड (वय 45) हे केसापुरीचे मोठे प्रस्थ म्हणून ओळखले जातं. त्यांनी 20 वर्ष केसापुरीचे माजी सरपंच म्हणून काम पाहिले आहे. 1 नोव्हेंबर पासून कोकाटे हदगाव तांडा (ता. परतूर) येथून ते बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने  माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल केली होती. तपासादरम्यान अंकुश राठोड हे वाटूर फाटा येथे ऊसतोड कामगारांची टोळी आणण्यासाठी गेल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाचा एक एक धागा जुळविण्यास सुरुवात केली. कोकाटे हादगाव येथे त्यांना शेवटचे पाहण्यात आल्याने आष्टी पोलिसामध्ये या प्रकरणी अंकुश राठोड बेपत्‍ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. जालन्याचे पोलिस अधिक्षक विनायक देशमुख व अप्पर पोलिस अधिक्षक विक्रांत देशमुख यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विशेष पथक स्थापन करुन जालन्याचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांच्याकडे या प्रकरणाचा तपास दिला. त्यानंतर यशवंत जाधव यांनी 4 कर्मचार्‍यांचे पथक तयार करुन तपासास सुरुवात केली. अंकुश राठोड हे कोकाटे हादगाव येथे शेवटचे दिसल्याने तेथील संशयितांवर पोलिस निरीक्षक जाधव यांनी लक्ष केंद्रीत केले. मात्र चौकशीत पाच संशयित अंकुश राठोड हे संध्याकाळी येथून गेल्याची एकच गोष्ट सांगत होते. चौकशी दरम्यान तेथे उपस्थित असलेल्या एका लहान मुलास काही सांगावयाचे आहे. हे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या चाणाक्ष नजरेत आले. त्यांनी त्या लहान मुलाला कॅडबरी चॉकलेट देत त्याचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर त्या मुलाने रात्री आपण अंकुश राठोड यास तेथेच पाहिल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपींवर पोलिसांचा संशय अधिक गडद झाला. त्यांनी पाचही आरोपींना वेगवेगळे बसवून विचारणा केली. यावेळी क्रॉस चेकींग दरम्यान आरोपी माहिती लपवित असल्याचे समोर आले. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपींनी अंकुश राठोड याचा खून करुन त्यांचा मृतदेह व दुचाकी अ‍ॅपेरिक्षामधून गंगा सावंगी येथील गोदावरी नदीच्या पात्रात टाकल्याचे पोलिसांना सांगितले. 

वाचा : तपास चक्र - बायकोची छेड काढली म्हणून मित्राला संपवलं, मृतदेहाच्या शर्टात दगड सापडल्यानंतर तपासाची सुत्रे अशी फिरली?

संशयित आरोपी एकनाथ चव्हाण व सुनिता चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांनी नगरपालिकेसह खासगी नाव मागवून नदीच्या पात्रात तपास सुरु केला. यावेळी त्यांना प्रथम मयत अंकुश राठोड याची दुचाकी सापडल्याने आरोपींनी दिलेली माहिती खरी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मयत अंकुश राठोड याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. अंकुश राठोड यांचा यापुर्वी अपघात झाला असल्याने त्याच्या डाव्या हातातील दंडात रॉड टाकण्यात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन मयताच्या दंडात रॉड असल्याचे निदर्शनास आल्याने तो मृतदेह अंकुश राठोड याचाच असल्याची पोलिसांची खात्री पटली.

वाचा : अक्कलकोट : तपास चक्र - बायकोच्या प्रियकराने केला नवऱ्याचा खून; शर्टमुळे लागला गुन्ह्याचा छडा

गुंतागुंतीच्या घटनेचा तपास जलदगतीने....

गुंतागुंतीच्या खुनाच्या घटनेचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत जलदगतीने लावण्यात यश आले. या गुन्ह्याचा तपास लावल्याबद्दल पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांनी पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांना पाच हजाराचे बक्षीस व प्रमाणपत्र दिले.

वाचा : तपास चक्र : सावंतवाडी - अतिप्रसंगात गेला होतो महिलेचा जीव; मोबाईलनेच फोडले गुन्ह्याचे बिंग