जालना : पुढारी वृत्तसेवा
तीर्थपुरी येथील शहागड रोडवरील समर्थ बेकर्समध्ये कामगाराची निर्घृण हत्या करण्यात आली. तीर्थपुरी शहागड रोडवर समर्थ बेकरी असून या बेकरीमधील कामगार ज्ञानेश्वर शेंडगे (वय २४, रा.घुंगरडे हादगाव, ता. अंबड) हा सोमवारी बेकरीमध्ये बाजेवर झोपलेला होता. या दरम्यान रात्री वारा वाजण्याच्या सुमारास कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.
या विषयी अधिक माहिती अशी की, समर्थ बेकरीमध्ये सोवारी रात्री त्याचा साथीदार सचिन परदेशी व ज्ञानेश्वर शेंडगे होते. सचिन परदेशी बेकरीच्या पुढच्या बाजूस मोबाईल पहात होता तर ज्ञानेश्वर शेंडगे हा पाठीमागे बाजेवर झोपला होता. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास सचिन परदेशी हा उठला असता त्याने बघितले की ज्ञानेश्वर रक्ताच्या थारोळ्यात बाजेवर पडलेला आहे आणि कुर्हाड त्याच्या अंगावर पडलेली आहे अशी माहिती सचिनने पोलिसांना दिली.
पोलिसांनी साथीदार सचिन परदेशी व बेकरीचे मालक यांना ताब्यात घेऊन विचारपूस सुरु केली आहे. समर्थ बेकरीमध्ये ज्ञानेश्वर एक दोन वर्षापासून कामाला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ज्ञानेश्वरला पाहून सचिनने शहागड रस्त्यावर येउन आरडाओरडा केला. या आवाजाने शेजाऱ्यांनी बेकरीकडे धाव घेतली. या घटनेची माहिती तीर्थपुरी पोलिसांना देण्यात आली. पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन कौळासे व श्रीधर खडेकर घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.
सकाळी सहा वाजता जालना येथील श्वानपथक व फिंगरप्रिंट पथक दाखल झाले असून तपास सुरू आहे. बेकरीचे मालक व दोण जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
ज्ञानेश्वर यांचा खून करण्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड ही बेकरीतीलच आहे. यावरून मारेकरी देखील जवळपासचा असल्याचा संशय घेतला जात आहे.पुढील तपास गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ व पोलिस उप निरिक्षक गजानन कौळासे, फौजदार श्रीधर खडेकर करत आहेत.