Fri, Feb 26, 2021 06:12
कोरोना झालेल्या राजेश टोपेंनी सोशल मीडियामार्फत शेअर केल्या आपल्या भावना

Last Updated: Feb 22 2021 3:07PM

वडीगोद्री (जालना) : पुढारी वृत्तसेवा

'पण अखेर 'त्याने' मला गाठलेच. मात्र आपल्या सद्भावना प्रेमामुळे त्याला हरवून मी पुन्हा एकदा कोरोना विरूद्धाच्या सामूहिक लढाईत सहभागी होणार आहे. तेव्हा चला तर मग हरवूया कोरोनाला. एकजुटीने एकमताने. एकनिर्धाराने.' असे पत्र सोशल मीडियावर टाकून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाला हरवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर तंतोतंत पाळा  व लॉकडाऊन टाळा असेही आव्हान केले आहे.

अधिक वाचा : जालना : एकाच दिवसात ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू

गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरुद्धची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका ठोस उपाययोजना व प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक कोरोना योद्धे विशेषतः डॉक्टर, नर्सेस आरोग्यसेवेक, पोलिस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करू शकलो. मात्र अद्यापही कोरोना गेलेला नाही. तो पुन्हा डोके वर काढत आहे. तेव्हा पुन्हा सामूहिक लढाई लढावी लागणार आहे. मी सध्या हॉस्पिटलमध्ये कोरोना विरुद्ध लढत आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो कोरोना हॉस्पिटलला भेटी दिल्या. परंतु कोरोनाला माझ्या जवळ येणे जमले नाही. पण आता मात्र त्याने मला गाठलेच. मात्र आपल्या सद्भावना, प्रेम यामुळे त्याला हरवून मी पुन्हा एकदा या सामूहीक लढाईत सहभागी होणार आहे.

अधिक वाचा : कार विहिरीत कोसळण्यापूर्वी आईनं चिमुकलीला खिडकीतून फेकलं बाहेर, पण...

समजदार संवेदनशील व सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे. म्हणूनच लॉकडाऊनच्या काळात सर्व जनतेने कोरोनाच्या संकटात अत्यंत संयमाने सामना केला. आता पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. लॉकडाऊन टाळणं केवळ आणि केवळ आपल्याच हाती आहे. तेव्हा आपणास माझी कळकळीचे आवाहन राहील की, मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर तंतोतंत पाळा व लॉकडाऊन टाळा. शेवटी स्वतःची काळजी म्हणजेच कुटूंबातील प्रिय व्यक्तीची काळजी म्हणजेच समाजाची काळजी. तेव्हा चला तर मग हरवूया कोरोनाला. एकजुटीने एकमताने. एकनिर्धाराने.