Wed, Jun 23, 2021 01:12
जालना: पाझर तलावात बुडून ३ मुलांचा मृत्यू

Last Updated: Jun 10 2021 9:46PM

जालना : पुढारी वृत्तसेवा 

कुसळी (ता. बदनापूर) शिवारात पाझर तलावात साचलेल्या पाण्यात बुडून तीन बालकाचा मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. यात भाऊ, बहिण व चुलतभाऊ यांचा समावेश आहे.

कुसळी येथे गुरुवारी दुपारी चार वाजता मनोज अंकुश वैद्य (वय ११), दिपाली अंकुश वैद्य (१०) व आकाश संजय वैद्य (७) हे त्याच्या शेताजवळील बैलभरा शिवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छोट्याश्या नाल्यावरील पाझर तलावाजवळ खेळत असताना पाण्यात उतरले. बुधवारी झालेल्या पावसामुळे तलावात ५ ते ६  फूट पाणी आले होते. वैद्य कुटुंबिय शेतीच्या कामात व्यस्त असतानाच या कुटुंबातील मनोज, दिपाली आणि आकाश हे पाण्यात बुडाले. शेतीकामात मग्न असलेल्या वैद्य कुटुंबियांना मुले दिसत नसल्यामुळे त्यांनी पाझर तलाव व इतरत्र या मुलांचा शोध सुरू केला असता मृतदेह आढळून आले.

या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.