Sun, Aug 09, 2020 13:17होमपेज › International › चिंताजनक! कोरोना हवेतून पसरतो; पुरावे मिळाले

चिंताजनक! कोरोना हवेतून पसरतो; पुरावे मिळाले

Last Updated: Jul 10 2020 1:40AM

file photoजिनिवा : पुढारी ऑनलाईन

कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर पसरतो, असे आतापर्यंत सांगितले जात होते. आता कोरोना हवेतून पसरत असल्याबाबतचे पुरावे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे. याआधी शास्रज्ञांच्या एका गटाने डब्ल्यूएचओला कोरोना विषाणू माणसांत कसा पसरतो याबाबत सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची विनंती केली होती. 

वाचा : देशात २४ तासांत ४८२ जणांचा मृत्यू 

कोरोना विषाणू हवेतून पसरत असल्याचे पुरावे तर मिळाले आहेत पण याबाबत ठोस काही सांगू शकत नाही, असेही डब्ल्यूएचओच्या संसर्ग नियंत्रण विभागाच्या तांत्रिक प्रमुख डॉ. बेनडेट्टा आलेग्रांझी यांनी म्हटले आहे. सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः गर्दीच्या ठिकाणी, कमी हवा आणि बंद जागी हवेतून कोरोना पसरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत पुरावे एकत्रित करुन ते समजून घेण्याची गरज आहे. यावर संशोधन सुरु आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

वाचा : कोरोना मृत्यू २० हजारांवर

याआधी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू संक्रमित व्यक्तीचे नाक आणि तोंडातून निघालेल्या सूक्ष्म कणांच्या माध्यमातून पसरतो, असे सांगितले होते. लोकांनी कमीत कमी ३.३ फूट अंतर ठेवल्याने कोरोनाला रोखणे शक्य आहे, असेही आवाहन करण्यात आले होते. आता कोरोना हवेतून पसरत असल्याच्या दाव्याला जागतिक आरोग्य संघटनेने दुजोरा दिला आहे.

क्लिनिकल इन्फेक्शियस डिसीज जर्नलमध्ये सोमवारी प्रकाशित झालेल्या पत्रात ३२ देशांच्या २३९ शास्रज्ञांनी फ्लोटिंग व्हायरस हवेतून लोकांना संक्रमित करत असल्याचे पुरावे मिळाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. हे पुरावे डब्ल्यूएचओने स्वीकारले आहेत.