Wed, May 19, 2021 05:45होमपेज › International › काश्मिरात सार्वमताच्या अटीसह पाकचा भारताला शांततेचा प्रस्ताव

काश्मिरात सार्वमताच्या अटीसह पाकचा भारताला शांततेचा प्रस्ताव

Last Updated: Oct 29 2020 1:49AM
इस्लामाबाद : वृत्तसंस्था

पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानमधील जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी एकत्रितपणे घेरलेले आहे. राजकीय संकटात अडकलेल्या इम्रान यांनी आता भारतासमोर शांततेचा प्रस्ताव ठेवला आहे. खरे तर पाकिस्तान आणि शांतता यांचा काही संबंधच नाही, हेच या प्रस्तावातून दिसून आले आहे. चर्चेसाठीची शर्त म्हणून इम्रान यांनी काश्मीरमध्ये भारताने सार्वमत घ्यावे, अशी मागणीही रेटली आहे.

पाकिस्तानची भारतासोबत शांततेसाठी चर्चा करण्याची तयारी आहे. मात्र, काश्मीरमधील  सैन्य भारताने मागे घ्यावे आणि त्यानंतर तेथे सार्वमत घेण्यात यावे. भारताशी वैर असण्याचे आमच्यासमोर दुसरे कारणच नाही. मी तर 2018 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताच क्षणी भारतासमोर शांततेचा प्रस्ताव ठेवला होता. भारताने शांततेसाठी एक पाऊल उचलले, तरी पाकिस्तान दोन पावले उचलेल, असेही मी म्हणालोे होतो. भारत सरकारने ऐकून न ऐकल्यासारखे केले. कारण, भारताला काश्मीर हडपायचा होता, असा बाळबोध आरोपही इम्रान खान यांनी केला. 

भारत सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवून काश्मीरचे रूपांतर एका तुरुंगात केल्याचा आरोप खान यांनी केला. भारत सातत्याने काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया करत असल्याची गरळ इम्रान खान यांनी ओकली आहे. सर्वच आघाड्यांवर इम्रान अपयशी ठरल्याने ते काश्मीरचे तुणतुणे वाजवत आहेत. त्यांच्या पक्षाने काश्मीरसाठी निदर्शनांचा कार्यक्रमही आयोजिला होता. 370 कलमाचा भारताचा अंतर्गत मुद्दा इम्रान यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते तोंडावर आपटले होते.

म्हणे, शांततेसाठी पाक सदैव तयार!

आम्ही शांततेसाठी नेहमीच तयार आहोत. भारतालाच समस्या आहेत. काश्मीरमधून आपले सैन्य भारताने मागे घ्यावे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार काश्मिरी नागरिकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार द्यावा. ते ठरवतील त्यांना कुठे आणि कसे राहायचे, अशी मुक्ताफळेही इम्रान खान यांनी उधळली आहेत.