Tue, Sep 29, 2020 18:45होमपेज › International › पाकिस्तानच्या वाटेवर नेपाळ!

पाकिस्तानच्या वाटेवर नेपाळ!

Last Updated: Jul 05 2020 10:27PM
काठमांडू : वृत्तसंस्था

नेपाळमध्ये राजकीय हालाचालींना वेग आला आहे. भारताचे तीन भूभाग नेपाळच्या नकाशात दाखवून त्यासाठी नेपाळ संसदेत कायदा मंजूर करून घेतल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्यावर त्यांच्याच कम्युनिस्ट पक्षातून राजीनाम्यासाठी दबाव वाढलेला आहे. या दबावादरम्यान त्यांनी नेपाळचे लष्करप्रमुख पूर्णचंद्र थापा यांच्याशी चर्चा केली आहे. ओली यांनी थापा यांच्याशी सौदेबाजी चालविली असल्याचा आरोप होत असून, ओलींचा पाकिस्तानप्रमाणे लष्कराधिष्ठित सरकार चालविण्याचा डाव असल्याचे बोलले जात आहे.

ओली यांनी थापांना आपले सरकार वाचवावे म्हणून गळ घातली असल्याचे म्हटले जाते. नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांनी नुकतेच तसे विधानही केले होते. दहल म्हणाले होते की, नेपाळमध्ये पाकिस्तानप्रमाणे सरकार चालविण्याचा प्रयोग होऊ शकतो; पण आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही. 

पक्षाकडून राजीनाम्यासाठी दबाव वाढत असताना ओली एखादी नवी खेळी खेळू शकतात. नेपाळमधील राजकीय विश्लेषकांच्या मते ओली अनेक पर्यायांवर विचार करीत आहेत. ते अनपेक्षित पाऊल उचलू शकतात. ओली यांनी स्वत: तसे संकेतही दिले आहेत. शनिवारी मंत्र्यांच्या बैठकीत ते म्हणाले होते, ‘कुणाला साथ देणार ठरवा? एक-दोन दिवसांत मी एक मोठा निर्णय घेणार आहे.’

रविवारी घडामोडी

पंतप्रधान ओलींनी राष्ट्रपतींना महाभियोगाद्वारे हटविण्याचा कट दहल यांच्याकडून रचला जात आहे, असा आरोप केल्यानंतर दहल यांनी रविवारी राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची शीतल निवासात भेट घेतली. नंतर प्रचंड ओलींच्या शासकीय निवासस्थानी धडकले. अर्धा तास दोघांत चर्चा झाली, पण तडजोड नाहीच.
 

 "