Wed, Aug 12, 2020 01:07होमपेज › International › अमेरिकेच्या ४ खासदारांवर चीनमध्ये बंदी 

अमेरिकेच्या ४ खासदारांवर चीनमध्ये बंदी 

Last Updated: Jul 13 2020 10:17PM
बीजिंग : वृत्तसंस्था 

चीनमधील शिनजियांग प्रांतात उइगर मुस्लिमांवरील अन्यायावरून होत असलेल्या टीकेमुळे चीनचा जळफळाट झाला असून, खवळलेल्या चीनने अमेरिकेतील चार खासदारांना चीनमध्ये प्रवेशास बंदी लादली आहे. मार्को रूबियो, टेड क्रूझ यांच्यासह धार्मिक स्वातंत्र्यासंबंधातले राजदूत सॅम ब्राऊनबॅक आणि ख्रिस स्मिथ अशी या खासदारांची नावे आहेत. 

चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ता हुआ चुनयिंग म्हणाले की, अमेरिकेने केलेल्या कारवाईमुळे अमेरिका-चीन संबंधांना धक्‍का बसला आहे. चीनच्या अंतर्गत बाबीत ही ढवळाढवळ आहे. राष्ट्रीय सार्वभौमत्वाबाबत चीन ठाम आहे. चीनमधील अल्पसंख्याक समूहावरील अन्याय आणि सत्तारूढ चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणांवर टीका केल्याने चीनने हे निर्बंध लादले आहेत. या खासदार आणि अधिकार्‍यांच्या व्हिसावरही निर्बंध लादले आहेत. तथापि, नुकतेच अमेरिकेने चिनी अधिकारी आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांवर निर्बंध लादले होते. त्याचे प्रत्युत्तर म्हणून चीनने ही कारवाई केल्याचे मानले जात आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी चिनी अधिकार्‍यांवर व्हिसाचे निर्बंध लादण्याचे वक्‍तव्य केले होते.