Mon, Apr 12, 2021 03:40
गोव्‍यातील टॅक्सी चालकांचा 'करा किंवा मरा' पवित्रा 

Last Updated: Apr 09 2021 2:58AM

पणजी : पुढारी वृत्तसेवा

‘गोवा माईल्स स्क्रॅप करा’, अशी घोषणा देत राज्यभरातील टॅक्सी चालकांनी तीन दिवस आझाद मैदानावर सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप दिले. टॅक्सीला मीटर बसविण्यास तयार आहोत, पण आधी अ‍ॅप आधारित टॅक्सीसेवा बंद करा, अशी मागणी त्यांनी केली. ‘करा किंवा मरा’ अशी भूमिका घेत आता गप्प राहणार नाही, कृती करणार, असे टॅक्सीचालकांनी सांगितले. सरकारने मागणी मान्य केली नाही, तर कुटुंबासमवेत आंदोलन करणार, असा इशारा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिला.

सरकारने आंदोलन गांभीर्याने घ्यावे. कुणाला त्रास होऊ न देता यावर आधीच तोडगा काढावा, अशी मागणी संघटनेचे सचिव बाप्पा कोरगावकर यांनी केली. मागील तीन दिवस आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. अद्याप वाहतूक खात्याचे मंत्री किंवा अधिकार्‍यांनी भेट दिलेली नाही. ते एसी केबिनमध्ये बसून आराम करीत आहेत. गोवा माईल्स आणण्याआधी आम्हाला विश्वासात घेतले व मंत्र्यांनी आपले खिसे भरण्यासाठी अ‍ॅप कार्यान्वित केले, असा आरोप त्यांनी केला.