Mon, Sep 21, 2020 05:02होमपेज › Goa › ‘ऑडिओ क्‍लीप’ मागे सिद्धनाथ बुयांव; मंत्री नीलेश काब्राल यांचा संशय

‘ऑडिओ क्‍लीप’ मागे सिद्धनाथ बुयांव; मंत्री नीलेश काब्राल यांचा संशय

Published On: Jan 03 2019 12:35AM | Last Updated: Jan 03 2019 12:21AM
पणजी : प्रतिनिधी

काँगे्रसने जारी केलेली ‘ऑडिओ टेप’हे काँग्रेसचे प्रवक्‍ते तथा संगीतकार सिद्धनाथ बुयांव यांनी आपल्या स्टुडिओत तयार केली असण्याची शक्यता आहे. मिमिक्री आर्टिस्टच्या सहाय्याने मंत्री विश्‍वजित राणे यांच्या आवाजात सदर ध्वनिमुद्रण केले असण्याचा संशय वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी व्यक्‍त केला आहे. येथील भाजप मुख्यालयात काब्राल आणि नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी काब्राल बोलत होते.

ते म्हणाले, की राफेल करार हा राज्याचा विषय नाही. त्यामुळे असा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला नाही. सदर मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी आपण आणि  मंत्री नाईक हेही उपस्थित होते. राफेल हा राष्ट्रीय विषय आहे, त्यामुळे आमच्या बैठकीत असा विषय येण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. काँग्रेसने घाबरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे नाटक केले आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी भाजपचीही भूमिका आहे. 

हे टेप प्रकरण हे भाजपच्या प्रतिमेला तडा देणारे ठरण्याची शक्यता आहे. आजकाल अनेक मोबाईल अ‍ॅपमुळे व त्यातील संदेशांमुळे लोकांमध्ये द्वेषभावना पसरू शकत असल्याने त्यावर कायदेशीररीत्या बंधन आणण्याचे पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत,असेही त्यांनी सांगितले. 
 
कुडचडेतील युवक ‘हुशार’ 

काँग्रेसने जारी केलेल्या टेपमध्ये मंत्री काब्राल यांनी आपल्या मतदारसंघातील युवकांना नोकरभरतीत संधी दिल्याने अन्य आमदार चिडल्याचे म्हटले गेले असल्याचे पत्रकारांनी लक्षात आणून दिल्यावर काब्राल म्हणाले, की वीज खात्याच्या काही जागांसाठी  परीक्षा घेण्यात आली होती. त्यात एकूण 41  पदांपैकी 11 जागा कुडचडे मतदारसंघातील युवकांना प्राप्त झाल्या होत्या. कदाचित या युवकांनी  अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास केला असण्याची शक्यता असू शकते.