होमपेज › Goa › पावसाची रिपरिप सुरूच

पावसाची रिपरिप सुरूच

Published On: Sep 03 2019 1:43AM | Last Updated: Sep 03 2019 1:43AM
पणजी : प्रतिनिधी 

राज्यभरात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. श्रीगणेशाच्या आगमनादिवशीच थोडी उसंत घेऊन पुन्हा जोरदार पाऊस, असे चक्र दिवसभर चालत राहिल्याने भाविकांनी नाराजी व्यक्‍त केली. पुढील तीन दिवस पावसाचा जोर चालूच राहणार आहे. त्यामुळे चतुर्थी यंदा पावसातच साजरी करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. 

सोमवारी राज्यात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पेडणेपासून काणकोणपर्यंत सर्व ठिकाणी सोमवारी पावसाने हजेरी लावल्याने गणरायाचे आगमनही पावसातच झाले. लोकांनी दुचाकीवरून, चारचाकींतून गणेशमूर्ती घरी आणल्या. गणेशमूर्ती घरी आणताना भाविकांनी छत्रीचा वापर करून मूर्तीचे पावसापासून रक्षण केले. गणेशाच्या पूजेसाठी पुरोहितांना छत्रीत घेऊन भाविक आपापल्या घरी पूजेच्या विधीसाठी घेऊन जाताना दिसत होते. मध्येच पावसाने उसंत घेतल्यानंतर लोक पुरोहितांना पूजेसाठी आणण्यासाठी     लगबग करत होते. पावसामुळे गणेश विधींनाही काही प्रमाणात उशीर झाला. 

राज्यभरातून काणकोण, केपे व दाबोळीत जोरदार पावसाने हजेरी लावली. मुरगाव, फोंडा, पणजी, सांगे, पेडणे, साखळी या भागातही पावसाची रिपरिप सुरूच होती. वेधशाळेच्या आकडेवारीनुसार काणकोण भागात सर्वाधिक 96 मि.मी. पावसाने हजेरी लावली. या पावसाळी हंगामात आतापर्यंत सांगे भागात सर्वाधिक पाऊस पडला आहे. गेल्या 24 तासांत तापमानात काही अंशांनी घट झाली असून कमाल तापमान 27.8 अंश सेल्सियस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके नोंद झाले आहे. 

राज्यात आतापर्यंत 133 इंच पावसाची नोंद झाली असून हे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा 25 टक्के अधिक आहे. जसजसा पावसाचा जोर वाढत आहे तसतसा सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाणही वाढत चालले आहे. अद्याप पावसाळा संपला नसून संपूर्ण सप्टेंबर महिना बाकी आहे. त्यामुळे यंदा पाऊस असाच बरसत राहिला तर दिडशे इंचांपर्यंत पावसाची मजल जाण्यची शक्यता आहे.