Mon, Sep 21, 2020 04:18होमपेज › Goa › ...तर मंत्री ढवळीकरांच्या घरावर सोमवारी मोर्चा

...तर मंत्री ढवळीकरांच्या घरावर सोमवारी मोर्चा

Published On: Jan 04 2019 1:51AM | Last Updated: Jan 04 2019 1:21AM
फोंडा ः प्रतिनिधी

राज्यातील बंद खाणी सुरू करण्यासाठी आतापर्यंत सरकारकडून फक्‍त आश्‍वासनेच मिळत असल्याने खाण अवलंबितांनी तीव्र संताप व्यक्‍त केला असून खाणी सुरू करण्यासाठी आश्‍वासने देणार्‍या मंत्री, खासदारांच्या घरावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार येत्या सोमवार दि. 7  जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या   घरावर आणि दि.10 जानेवारी रोजी तिन्ही खासदारांच्या घरावर  मोर्चा नेणार असून त्याच दिवशी ‘गोवा बंद’चाही निर्णय घेण्यात येणार आहे, असे खाण अवलंबितांच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर  पुती गावकर यांनी पत्रकार परिषदेत 
सांगितले.

गावकर म्हणाले, येत्या सोमवार दि.7 रोजी सकाळी 8 वाजता  मंत्री तथा मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांच्या  बांदोडा येथील घरी जाऊन खाण अवलंबित जाब विचारणार आहेत. खांडेपार पूल उद्घाटनाच्या वेळी खाण अवलंबितांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी दूरध्वनीवर संभाषण करून 6 जानेवारीपर्यंत तोडगा काढू, असे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे 6 तारखेपर्यंत वाट पाहण्याचे खाण अवलंबितांनी ठरवले आहे. त्यानंतर 10 जानेवारीला राज्यातील तिन्ही खासदार श्रीपाद नाईक, नरेंद्र सावईकर व विनय तेंडुलकर यांच्याही घरी जाऊन जाब विचारण्यात येणार आहे.

या समन्वय समितीच्या बैठकीला खाण मंचचे अध्यक्ष पुती गावकर, गोवा सुरक्षा मंचचे प्राचार्य सुभाष वेलिंगकर, खाण मंचचे विनायक गावस, महेश गावस, संदीप परब, खेमलो सावंत तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

गोवा खाण मंचच्या समन्वय समितीची  गुरुवारी  फोंड्यात बैठक झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत  खाण अवलंबितांंनी आता आंदोलन तीव्र करण्यावर भर दिल्याचे स्पष्ट केले. खांडेपार पुलाच्या उद्घाटनावेळी खाण अवलंबितांनी पुलावर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी खाण मंचच्या पदाधिकार्‍यांकडे बैठक घेऊन तोडगा काढला होता. त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी सुदिन ढवळीकर यांनी मोबाईलवर संभाषण साधून पुलाचे उद्घाटन आणि खाण अवलंबितांची सद्यस्थिती यासंबंधी माहिती दिली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी याविषयी तोडगा काढणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. सुदिन ढवळीकर यांनी त्यावेळेला 6 जानेवारीपर्यंत तोडगा निघेल, असे आश्‍वासन दिल्याने खाण अवलंबितांनी आंदोलन मागे घेतले होते. 

आता येत्या 6 जानेवारीपर्यंत वाट पाहून 7  रोजी सुदिन ढवळीकर यांच्या घरावर मोर्चा नेऊन त्यांनाच घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचा निर्धार खाण अवलंबितांनी केला आहे. यावेळेला प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जाईल, असे पुती गावकर यांनी सांगितले तर सुदिन ढवळीकर जोपर्यंत याप्रकरणी ठोस कृती करीत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या निवासस्थानाहून हटणार नसल्याचे खाण मंचतर्फे स्पष्ट करण्यात आले.

...तोपर्यंत हटणार नाही!

आतापर्यंत फक्‍त आश्‍वासने झाली. त्यामुळे थेट मंत्री, खासदारांच्या घरी गेल्यानंतर ठोस कृती झाल्याशिवाय खाण अवलंबित हटणार नाहीत, असे पुती गावकर यांनी सांगितले. खाणी सुरू करण्यासाठी सरकारकडून कोणतीही कृती होत नसल्याने खाण अवलंबितांना उपाशी मारून या खाणी नंतर लिलावात कुणाला तरी देण्याचा सरकारचा डाव आहे काय, असा सवालही खाण अवलंबितांनी केला.