Mon, Sep 21, 2020 04:40होमपेज › Goa › भाजप कदापिही सोडणार नाही : लक्ष्मीकांत पार्सेकर

भाजप कदापिही सोडणार नाही : लक्ष्मीकांत पार्सेकर

Published On: Mar 16 2019 1:58AM | Last Updated: Mar 16 2019 1:02AM
पणजी : प्रतिनिधी

भाजप पक्षाचा आपण निष्ठावान सेवक असून आपण पक्ष कदापिही सोडणार नाही. पक्षातील काही नेत्यांनी आपल्यावर अन्याय केला असला तरी मनाविरोधी घडलेल्या एका घटनेमुळे गेल्या 30 वर्षांच्या अभिमानास्पद कामगिरीवर आपण पाणी फिरणार नाही, असे ज्येष्ठ भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. 

दयानंद सोपटे यांना काँग्रेसमधून आणले व भाजप त्यांना विधानसभेच्या पोटनिवडणुकीला तिकीट देत आहे, याची जाणीव झाल्यानंतर पार्सेकर यांनी गेले काही महिने भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांना टीकेचे लक्ष्य बनविले होते. पार्सेकर यांनी आपण प्रसंगी अपक्ष लढेन अशा प्रकारचे संकेत आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते. भाजपच्या मांद्रेतील बहुतेक कार्यकर्त्यांना आपल्यासोबत ठेवण्यातही पार्सेकर यांना यश आले होते. याच पार्श्‍वभूमीवर पार्सेकर यांनी आता नरमाईचे धोरण स्वीकारले आहे.या विषयावर पार्सेकर म्हणाले की, आपण गेली 30 वर्षे भाजपच्या वाटचालीचा अविभाज्य भाग बनलो आहे. पक्षाच्या राजकीय वाटचालीत आपण अनेक चढ-उतारांचा साक्षीदार व त्यात प्रमुख भूमिकाही निभावली आहे. आम्ही भाजपचे काम करताना अनेक खस्ता खाल्ल्या आणि अनेक बरे-वाईट अनुभवही घेतले. पक्षाचा दोनवेळा प्रदेशाध्यक्ष, तीनवेळा आमदार आणि एकदा मुख्यमंत्री पदही आपण भूषवले आहेत. केवळ पक्षातील काही नेत्यांच्या पक्षविरोधी निर्णयामुळे आपले स्थान कमी होऊ न देण्याचे आपण ठरविले आहे. 

मांद्रे मतदारसंघाबाबत काही निर्णय घेताना आपल्याला विश्‍वासातही घेण्यात आले नसल्याने आपण दुखावलो गेलो होतो.  सोपटे यांच्या भाजप प्रवेशामुळे मतदारसंघातील भाजप कार्यकर्तेही नाराज झाले आहेत. जनतेच्या आणि खास करून भाजप समर्थकांच्या नुकत्याच घेतलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. केवळ आपल्यामुळे या भाजप समर्थकांना पक्षापासून दूर नेण्याचे पाप आपण करणार नाही. मांद्रेच्या पोटनिवडणुकीत अपक्ष राहून लढा देण्याचेही आपण योजले होते. मात्र, भाजपविषयी आपण आता भावनिक झालेलो असून आत्मचिंतन केल्यावर हा पक्ष सोडू शकत नसल्याचे आपणाला जाणवले.आपण कार्यकर्त्यांची समजूत घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोपटे यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये आणण्याची चूक ही एका व्यक्तीने केली आहे. एक व्यक्ती चुकीच्या पदावर बसली आहे व त्या व्यक्तीने ती चूक केली. त्यासाठी मी पूर्ण पक्षाला कधीच दोष दिला नाही व आताही देत नाही. आपण भाजपसोबतच राहीन. पक्षाने आपल्यावर उमेदवार निवड समितीचे एक सदस्य म्हणूनही जबाबदारी दिली असल्याने ती निभावणार असल्याचे पार्सेकर म्हणाले.

लोकसभा प्रचारावर भर : पार्सेकर

मांद्रेच्या पोटनिवडणुकीत पक्षाचे कार्य म्हणून दयानंद सोपटे यांचा प्रचार करणार का, असा प्रश्‍न केला असता पार्सेकर म्हणाले की, आपल्या मते लोकसभेच्या तुलेनत पोटनिवडणूक गौण आहे. आपल्यामुळे भाजपला अपशकून होऊ नये म्हणून अपक्ष राहण्याचा विचार मागे घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात सत्तेवर येणे हे आपण अधिक महत्वाचे मानत आहे. यासाठी आपण लोकसभेच्या प्रचारावर भर देणार आहे.