होमपेज › Goa › मांडवीतील एका कॅसिनोच्या स्थलांतरासाठी जागा निश्चित

मांडवीतील एका कॅसिनोच्या स्थलांतरासाठी जागा निश्चित

Last Updated: Oct 09 2019 11:57PM
पणजी  : प्रतिनिधी

मांडवी नदीतील पाचपैकी एक कॅसिनो जहाजाचे नदीच्या दुसर्‍या बाजूला स्थलांतर करण्यासाठी जागा निश्चित झाली आहे. सदर जागेला बंदर कप्तान व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर या कॅसिनोचे स्थलांतर होणार असल्याचे बंदर कप्तान  खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले. 

पर्वरीत मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना मंत्री लोबो म्हणाले, की बंदर कप्तान खात्याकडून मांडवी नदीतील बेती बाजूने एक कॅसिनो हलविण्यासाठी नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाचा अहवाल आपल्याला लवकरच मिळणार आहे. या अहवालाला मुख्यमंत्र्यांची  मान्यता मिळाल्यानंतरच सदर जागा जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर सदर कॅसिनो मालकाला आपले जहाज या दुसर्‍या ठिकाणी स्थलांतर करण्यास सांगितले जाणार आहे. मांडवी नदीतील  एक जहाज दुसर्‍या बाजूला गेल्यास कॅसिनोंची गर्दी  थोडीफार कमी होईल. 

दरम्यान, मांडवीतील सर्वच कॅसिनो हटविण्याची सरकारची तयारी असली तरी सदर गुंतणूकदारांना रातोरात आपला व्यवसाय अन्यत्र हलविणे शक्य नाही. यासाठी कॅसिनोंसाठी विशेष जागा निर्माण होण्याची गरज आहे.

राज्य सरकारकडून मोपा विमानतळाच्या जागेत कॅसिनो हलविण्याचा प्रस्ताव दिला जाणार आहे.  मात्र, त्याआधी मोपा नियोजित विमानतळ कधी बांधून तयार होईल, याची खात्रीशीर माहिती प्राप्त व्हावी लागणार आहे. त्यानंतर 3 ते 5 वर्षांत सर्व ऑफ शोअर कॅसिनो मोपामध्ये स्थलांतरित करण्यास   कॅसिनो मालकांना सांगितले जाणार असल्याचे बंदर कप्तान खात्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले.