Mon, Sep 21, 2020 05:43होमपेज › Goa › पणजीतील मतदारांना कुंकळ्येकरांकडून धमक्या

पणजीतील मतदारांना कुंकळ्येकरांकडून धमक्या

Published On: May 05 2019 12:56AM | Last Updated: May 05 2019 12:56AM
पणजी : प्रतिनिधी

पणजीत विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचार जोरात सुरू आहे. भाजपमध्ये प्रचंड नैराश्य पसरले असून प्रचारात या निवडणुकीसंदर्भात भाजपचे दोन गट झाल्याचे दिसून येते. भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर पणजीच्या मतदारांना राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नावाने धमकावत असून सदर धमक्यांचे सत्रत्यांनी बंद करावे, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

चोडणकर म्हणाले, भाजपकडून अमित शहा यांच्या नावाचा वापर मते मिळावित म्हणून धमकावण्यासाठी केला जात आहे. अमित शहा काही कारवाई करतील अशा धमक्या देऊन कुंकळ्येकर मतदारांना घाबरविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे कार्यकर्त्यांकडून आम्हाला कळले आहे. काँग्रेसने कधीच पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावे धमकावून मते मागितली नाहीत. भाजपकडून दादागिरी केली जात आहे. ही सभ्यतेची भाषा नाही हे कुंकळ्येकर यांनी समजून घेण्याची गरज आहे. अशा धमक्यांचा आम्ही निषेध करतो.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडूनदेखील सरकारी अधिकार्‍यांना धमक्यांचे सत्र सुरू आहे. सरकारी अधिकारी जे काँग्रेसला प्रचारात मदत करीत आहेत त्यांना बदली करण्याची धमकी मुख्यमंत्र्यांकडून देण्यात येत आहे. बदलीच्या भीतीने काही अधिकारी उघडपणे कारण सांगायला पुढे येत नाहीत. सरकारी कार्यालयातील अधिकार्‍यांकडूनही कर्मचार्‍यांना काँग्रेसचा प्रचार न करण्याबाबत सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकारांचा दुरूपयोग करून कर्मचार्‍यांवर राजकीय दबाव आणणे बंद करावे. आपल्या पसंतीच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे, असे चोेडणकर यांनी सांगितले. 

पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर,आमदार निळकंठ हळर्णकर, इजिदोर फर्नांडिस, पक्षाचे म्हापसा पोटनिवडणूक उमेदवार सुधीर कांदोळकर, पणजीचे महापौर उदय मडकईकर, माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, प्रवक्ते यतिश नाईक, अहराज मुल्ला, विजय पै व अन्य उपस्थित होते.